राज्यातील प्रदूषित नदी पट्ट्यांच्या
पुनरुज्जीवनाचा कार्यक्रम हाती घेणार
- पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे
मुंबई, दि. ९ - केंद्र शासनाच्या राष्ट्रीय जल गुणवत्ता मोजमाप योजनेनुसार झालेल्या सर्वेक्षणानुसार केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाने अहवाल प्रसिद्ध केला आहे. यात राज्यातील ५६ प्रदूषित नदी पट्ट्यांचा समावेश आहे. या नदी पट्ट्यांच्या पुनरुज्जीवनाचा कार्यक्रम हाती घेण्यात येणार असल्याचे पर्यावरण आणि वातावरण बदल मंत्री पंकजा मुंडे यांनी विधान परिषदेत सांगितले. याबाबत मुख्यमंत्र्यांकडे लवकरच बैठक घेण्यात येणार असल्याचेही त्या म्हणाल्या.
सदस्य रणजितसिंह मोहिते-पाटील यांनी राज्यातील प्रदूषित नद्यांसंदर्भात प्रश्न उपस्थित केला होता. या अनुषंगाने झालेल्या चर्चेत सदस्य सर्वश्री ज्ञानेश्वर म्हात्रे, एकनाथ खडसे, प्रवीण दरेकर यांनी सहभाग घेतला.
पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे म्हणाल्या की, राज्यातील नद्यांच्या प्रदूषणाची विविध कारणे आहेत. त्यानुसार नदीपट्ट्यांचे वर्गीकरण करुन संबंधित विविध विभागांच्या सहाय्याने नद्यांचे पुनरुज्जीवन करण्यात येईल. तसेच उद्योग विभागासोबत पाण्यावर प्रक्रिया करुन सोडण्याबाबत काम करण्यात येत आहे. त्याचबरोबर रसायन उत्पादक कंपन्यांसोबत आढावा घेऊन रसायनयुक्त पाणी नद्यांमध्ये सोडण्यात येऊ नये याबाबत उपाययोजना करण्यात येत आहेत. केंद्र सरकारकडून नदी पुनरुज्जीवनासाठी निधी उपलब्ध होत असून केंद्र आणि राज्य शासनाच्या एकत्रित प्रयत्नातून नद्या स्वच्छ करण्यासाठी प्रयत्न करण्यात येत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
नाग, मुळा-मुठा, चंद्रभागा या नद्या स्वच्छ करण्याचे काम हाती घेण्यात आले असून उल्हास, वालधुनी या नद्या देखील स्वच्छ करण्यात येतील असे त्या म्हणाल्या. जळगाव जिल्ह्यातील वेल्हाळ तलावात जाणाऱ्या प्रदूषित पाण्याबाबत वरिष्ठ अधिकाऱ्यांमार्फत तपासणी करण्यात येईल, असेही पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांनी याबाबतच्या उपप्रश्नांच्या उत्तरात सांगितले.
No comments:
Post a Comment