अणुशक्तीनगर येथे तालुका क्रीडा संकुल उभारणीच्या प्रक्रियेस गती द्यावी
- उपमुख्यमंत्री अजित पवार
• अल्पसंख्याकांच्या सामाजिक, शैक्षणिक विकासासाठी योजना प्रभावीपणे राबवा
• अल्पसंख्याक मुलींसाठी अभियांत्रिकी महाविद्यालय उभारणीस गती
मुंबई, दि. २४ : अणुशक्तीनगर येथे म्युनिसिपल स्पोर्ट्स कॉम्प्लेक्ससाठी आरक्षित असलेल्या १०,३३३.९१ चौ.मी. क्षेत्र बृहन्मुंबई महानगरपालिकेकडे हस्तांतरित करून स्पोर्ट्स कॉम्प्लेक्सच्या कामास गती द्यावी, असे निर्देश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले. या प्रकल्पासाठी निधी उपलब्ध करून दिला जाणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
अणुशक्तीनगर येथे म्युन्सिपल स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स उभारणेबाबत तसेच अल्पसंख्याक विकास विभागाच्या विविध समस्यांबाबत मंत्रालयात बैठक आयोजित करण्यात आली होती. यावेळी ते बोलत होते. बैठकीस क्रीडा व युवक कल्याण, अल्पसंख्याक विकास मंत्री दत्तात्रय भरणे, वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ, माजी मंत्री नवाब मलिक, आमदार सना मलिक यांच्यासह वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
उपमुख्यमंत्री श्री. पवार म्हणाले की, मुंबई शहरात क्रीडापटूंना दर्जेदार क्रीडा सुविधा व प्रशिक्षण देण्यास हे स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स महत्वाचे ठरणार आहे. संबंधित भूखंड हा म्युनिसिपल स्पोर्ट्स कॉम्प्लेक्ससाठी आरक्षित असल्याने, यापूर्वी त्या जागेसंदर्भात दि चिल्ड्रन एड सोसायटीसोबत असलेले भाडेकरार संपुष्टात आणावे. यासंदर्भात महसूल विभागाशी समन्वय साधून सदर भूखंड हा महानगरपालिकेकडे क्रीडा संकुल उभारणीसाठी हस्तांतरित करावा. तसेच या जागेवर अतिक्रमण असल्यास ते निष्कासित करण्यात यावे. या क्रीडा संकुलात अद्ययावत सुविधांसह क्रीडा संकुल उभारावे यासाठी निधी उपलब्ध करून देण्यात येईल, असेही त्यांनी यावेळी सांगितले.
No comments:
Post a Comment