शालेय इमारतींच्या सुरक्षेसाठी शासनाचा पुढाकार
- राज्यमंत्री डॉ. पंकज भोयर
मुंबई, दि. १७ : राज्य सरकारने शाळा इमारतींच्या सुरक्षिततेबाबत गंभीर पावले उचलली आहेत, अशी माहिती शालेय शिक्षण राज्यमंत्री डॉ.पंकज भोयर यांनी विधान परिषदेत दिली.
विधान परिषदेत अर्धा तास चर्चेला उत्तर देताना शालेय शिक्षण विभागाचे राज्यमंत्री डॉ.भोयर बोलत होते. यावेळी सदस्य सर्वश्री ज्ञानेश्वर म्हात्रे, अमोल मिटकरी, इद्रिस नायकवडी, जगन्नाथ अभ्यंकर, धीरज लिंगाडे, अरुण लाड, किशोर दराडे या सदस्यांनी सहभाग घेतला.
राज्यमंत्री डॉ.भोयर यांनी सांगितले की, अहमदनगर जिल्ह्यातील शाळेच्या वर्गखोलीचे छत कोसळून तीन विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला होता. या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील सर्व जिल्हा परिषद प्राथमिक शाळांचे स्ट्रक्चरल ऑडिट करण्यात आले. आजपर्यंत २,५३८ वर्गखोल्यांचे निर्लेखन करण्यात आले असून, १,४६२ नवीन वर्गखोल्यांचे बांधकाम पूर्ण झाले आहे. तसेच ३,४३५ वर्गखोल्यांची दुरुस्ती देखील करण्यात आली आहे.
पुणे जिल्ह्यातील शाळांबाबत माहिती देताना त्यांनी सांगितले की, ३६८ मोडकळीस आलेल्या वर्गखोल्यांपैकी २३४ वर्गखोल्यांचे बांधकाम सुरू असून, ₹३.५ कोटी खर्च करण्यात आला आहे. २०२४-२५ या आर्थिक वर्षात महानगरपालिकेच्या शाळांसाठी एकूण ₹९ कोटींची तरतूद करण्यात आली आहे.
राज्यमंत्री डॉ. भोयर यांनी स्पष्ट केले की, स्ट्रक्चरल ऑडिटमध्ये धोकादायक ठरलेल्या इमारतींमध्ये वर्ग न भरविण्याचे निर्देश देण्यात येतील. अशा इमारती पाडून नवीन बांधकाम करण्यावर भर दिला जाणार आहे.
खाजगी व्यवस्थापनाच्या शाळांनी स्थानिक स्वराज्य संस्थेकडून इमारतींसाठी घेतलेली परवानगी तपासली जाईल. राज्यातील सर्व शाळांना मान्यताप्राप्त नकाशे मिळवण्याची सूचना देण्यात येणार आहे.
आदिवासी पाड्यांतील शाळांमध्ये अद्याप पुरेशा पायाभूत सुविधा उपलब्ध नसल्याचे सदस्य श्री. मिटकरी यांनी लक्षात आणून दिले. या पार्श्वभूमीवर डॉ.भोयर यांनी सर्व शिक्षण अधिकाऱ्यांना पाहणी करून अहवाल लोकप्रतिनिधींकडेही सादर करण्याचे निर्देश देण्याचे आश्वासन दिले.
शाळांच्या इमारती जिल्हा परिषद, महापालिका किंवा नगरपालिका यांच्या मालकीच्या असतात. त्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थांनीही शाळा बांधकामासाठी पुढाकार घ्यावा, असे आवाहन राज्यमंत्री डॉ .भोयर यांनी केले.
No comments:
Post a Comment