सुनियोजित आणि विकसित शहरासाठी
पुढील ५० वर्षाचे नियोजन व्हावे
- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या विविध प्रकल्पांचे लोकार्पण व भूमिपूजन
चऱ्होलीची नगर रचना योजना रद्द करण्याचे निर्देश
पुणे, दि. १८ : पिंपरी-चिंचवड हे वेगाने विकसित होत असलेले शहर असून त्याचा विकास सुनियोजितरित्या होण्यासाठी शहराचा उत्तम आराखडा करा आणि पुढच्या पिढीचा विचार करून आगामी ५० वर्षासाठीचे नियोजन करण्याचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले. शहराचे नियोजन करत असतांना जनतेला विश्वासात घेणे गरजेचे असून त्यादृष्टीने लोकप्रतिनिधी आणि जनतेच्या मागणीनुसार चऱ्होलीची नगररचना योजना रद्द करावी असे निर्देशही मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिले.
पिंपरी चिंचवड महापालिकेच्यावतीने पुणे-आळंदी पालखी मार्गावर वडमुखवाडी येथे उभारण्यात आलेल्या संत ज्ञानेश्वर महाराज आणि संत नामदेव महाराज भेटीचे समुहशिल्प व संतसृष्टीचे लोकार्पण, संतपीठ येथील प्रेक्षागृह व कलादालन लोकार्पण यासह विविध विकासप्रकल्पांचे भूमिपूजन आणि उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. यावेळी खासदार श्रीरंग बारणे, आमदार उमा खापरे, अमित गोरखे, श्रीकांत भारतीय, महेश लांडगे, शंकर जगताप, माजी आमदार अश्विनी जगताप, पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे, महापालिका आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह, जिल्हाधिकारी, संत साहित्याचे अभ्यासक ज्येष्ठ साहित्यिक डॉ. सदानंद मोरे आदी उपस्थित होते.
संत ज्ञानेश्वर माऊलींनी वारकरी संप्रदायाचा पाया रचला आणि संतश्रेष्ठ तुकाराम महाराजांनी त्यावर कळस चढविला, असे सांगून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, ज्ञानेश्वर माऊलींनी सोप्या शब्दात भागवत धर्माचे तत्वज्ञान आणि वैश्विक विचार आपल्यापर्यंत पोहोचविला. त्यामुळेच माऊलीच्या पालखीत लाखो वारकरी सहभागी होतात. संत नामदेव महाराजांनी ही परंपरा आपल्यापर्यंत अभंगाच्या माध्यमातून पोहोचविताना भागवत धर्मातील हा विचार पंजाबपर्यंत पोहोचविला. शिखांचा धर्मग्रंथ 'गुरु ग्रंथसाहिब'मध्ये संत नामदेव महाराजांचे विचार समाविष्ट आहेत. ज्यांनी भागवत धर्माला उंची दिली. अशा दोन संतश्रेष्ठाच्या भेटीचे शिल्प महानगरपालिकेने उभारले आहे. वारकरी संप्रदायात प्रत्येक जण एकमेकांना माऊली समजतो, ईश्वराचे रूप समजतो, हाच भाव या शिल्पात आहे, असे मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले.
आपला वैश्विक विचार जगाला साद घालणारा
जगाला साद घालणारा आणि दिशा देणारा असा आपला वैश्विक विचार आहे. एका पिढीने दुसऱ्याला दिल्याने तो टिकून आहे. सूर्य-चंद्र असेपर्यंत वारी आहे आणि तोपर्यंत विचार आहे. या विचाराच्या प्रसारासाठी पिंपरी चिंचवड महानगरपालिकेने सुंदर संतपीठ तयार केले. ‘सीबीएसई’ अभ्यासक्रमासोबत हा विचार पोहोचविण्याचे कार्य संतपीठाच्या माध्यमातून होत आहे. त्यामुळे संतपिठाच्या विस्तारासाठी आराखडे, नियोजन केल्यास राज्य शासन त्यासाठी सर्वतोपरी मदत करेल.
No comments:
Post a Comment