शेतमालाच्या बाजारमूल्य निश्चितीमुळे शेतकऱ्यांना मिळणार अधिक फायदा
स्मार्ट प्रकल्पांतर्गत कापूस, हळद आणि मका पिकांसाठी हेजिंग डेस्क
- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
मुंबई, दि. २७ : शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढून शेतकऱ्यांनी उत्पादित केलेल्या मालाला योग्य बाजारमूल्य मिळावे यासाठी, मा. बाळासाहेब ठाकरे कृषी व्यवसाय व ग्रामीण परिवर्तन प्रकल्प, स्मार्टअंतर्गत पहिल्या टप्प्यात पुणे येथे कापूस, हळद आणि मका या पिकांसाठी ‘हेजिंग डेस्क’ सुरू केला आहे. टप्प्या-टप्प्याने इतर पिकांसाठी हा उपक्रम राबविण्यात येणार आहे. या उपक्रमामुळे शेतकरी त्यांच्या उत्पादनांच्या भविष्यातील किंमतीतील चढ-उतारामुळे होणारे नुकसान टाळू शकतात. ‘सेबी’चे नियंत्रण असलेल्या एनसीडीईएक्स (NCDEX) संस्थेच्या कमोडिटी मार्केट्स आणि संशोधन संस्थेने (NICR) या प्रकल्पासाठी सहकार्य केले आहे.हा उपक्रम कृषी क्षेत्रातील विकासाच्या दिशेने एक महत्वाचे पाऊल आहे, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकल्पाची माहिती देताना सांगितले.
‘हेजिंग डेस्क’ म्हणजे काय
'हेज' म्हणजे बाहेरून येणा-या संकटांपासून संरक्षण देण्यासाठी, त्यांना अटकाव करण्यासाठी बांधलेले साधन, घराला जसे दार, तसे शेताला कुंपण. किंमतीच्या चढ-उतारातून निर्माण होणाऱ्या संकटापासून संरक्षण देणारे जे साधन तेही एकप्रकारचे कुंपणच आहे ज्याला ‘हेजिंग’ म्हणतात. भविष्यकाळातील कमी होणाऱ्या किंमतींपासून निर्माण होणारी जोखीम कमी करणे हा ‘हेजिंग’ चा मुख्य उद्देश आहे. भविष्यकाळातील वाढणाऱ्या किंमतीचा फायदा घेण्यासाठी ऑप्शन ट्रेडिंगचा वापर केला जाऊ शकतो. जागतिक बँकेच्या सल्ल्यानुसार आणि प्रकल्प अंमलबजावणी आराखड्यानुसार शेतकरी व शेतकरी उत्पादक कंपन्यांनी शेतमालाच्या किंमतीतील जोखीम कमी करण्यासाठी वायदे बाजारात सहभागी होण्याकरिता तसेच त्यांना याबाबत मार्गदर्शन व प्रशिक्षण देण्यासाठी ‘हेजिंग डेस्क’ (Hedging Desk) सुरु करण्यात आलेला आहे.
No comments:
Post a Comment