राज्यातील प्रकल्पांचे भूसंपादन ठरलेल्या वेळापत्रकानुसार पूर्ण करा
कोणताही प्रकल्प रखडणार नाही याची सर्व संबंधितानी दक्षता घ्यावी
- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
मुंबई, दि. १९ : राज्यातील महत्त्वाच्या सर्व प्रकल्पांचे भूसंपादन ठरलेल्या वेळापत्रकानुसार पूर्ण करून प्रकल्प लवकरात लवकर मार्गी लावावेत. तसेच भूसंपादनाअभावी एकही प्रकल्प रखडणार नाही याची संबंधित सर्व यंत्रणांनी दक्षता घ्यावी, अशा सूचना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिल्या.
राज्यातील महत्त्वाच्या प्रकल्पांच्या भूसंपादनाचा आढावा मुख्यमंत्री फडणवीस यांनी वर्षा निवासस्थानी घेतला. त्यावेळी मुख्यमंत्री फडणवीस यांनी या सूचना दिल्या. यावेळी नागपूर – गोवा शक्तिपीठ महामार्ग, विरार – अलिबाग कॉरिडोर, जालना – नांदेड द्रुतगती महामार्ग, पुणे रिंग रोड पूर्व, पश्चिम व विस्तारीकरण, भंडारा – गडचिरोली द्रुतगती महामार्ग, नागपूर – चंद्रपूर द्रुतगती महामार्ग, नागपूर – गोंदिया द्रुतगती महामार्ग, नवेगाव (मोर) – सुरजागड मिनरल कॅरिडोर, वाढवण – इगतपुरी द्रुतगती महामार्ग या राज्यातील रस्ते प्रकल्पांच्या भूसंपादनाचा तसेच वर्धा - नांदेड, वडसा – गडचिरोली रेल्वे प्रकल्प आणि कोल्हापूर, कराड, अकोला, गडचिरोली आणि छत्रपती संभाजीनगर येथील विमानतळाच्या भूसंपादनाचा सविस्तर आढावा घेण्यात आला.
प्रकल्प रखडल्यामुळे त्याच्या किंमतीमध्ये मोठ्या प्रमाणावर वाढ होते असे सांगून मुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणाले की, भूसंपादनाच्या प्रक्रियेसाठी सर्व यंत्रणांना टाईमलाईन दिलेली आहे. त्याचे तंतोतंत पालन करण्यात यावे. सर्व यंत्रणा आणि संबंधित अधिकारी यांनी मिशन मोडवर काम करावे. भूसंपादनाची कामे गांभीर्याने घेऊन तातडीने मार्गी लावावीत. याबाबत सर्वांनी गुणात्मक आणि रचनात्मक काम करावे अशा सूचनाही मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी यावेळी दिल्या.
No comments:
Post a Comment