गडचिरोली देशातील 'स्टील हब' होईल : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
खनिज व धातू क्षेत्रातील उद्योग स्थापन झाल्यामुळे आगामी पाच वर्षांमध्ये गडचिरोली जिल्हा देशातील स्टील निर्मितीचे मोठे केंद्र होईल व जिल्ह्याचे मागासलेपण इतिहासजमा होईल असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी केले. खनिज व धातुशास्त्र या विषयांकरिता जगात दुसऱ्या क्रमांकाचे विद्यापीठ असलेल्या कर्टीन विद्यापीठाशी सहकार्य करार केल्यामुळे आजचा दिवस गोंडवाना विद्यापीठाच्या इतिहासात सुवर्णाक्षरांनी लिहिल्या जाईल असे मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले.
ऑस्ट्रेलियासोबत सामंजस्य करार करण्याची एकाच आठवड्यात ही दुसरी वेळ आहे असे सांगून मुंबईत झालेल्या 'वेव्ह्ज' शिखर परिषदेच्या वेळी पश्चिम ऑस्ट्रेलिया येथील विद्यापीठासोबत नवी मुंबई येथे कॅम्पस स्थापन करण्याबाबत करार झाल्याचे मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले.
गडचिरोली येथील विद्यापीठाचा लॉइड्स स्टील तसेच कर्टीन विद्यापीठासोबत तंत्रज्ञान शिक्षण संस्था स्थापन करण्याबाबत करार झाल्यामुळे राज्यातील उद्योगाला उत्तम दर्जाचे मनुष्यबळ मिळण्यास मदत होईल, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.
राष्ट्रीय शैक्षणिक धोरणामुळे ज्ञानाची कवाडे उघडली असून देशाबाहेरील विद्यापीठांना राज्यात कॅम्पस स्थापित करण्याचे दृष्टीने नवी मुंबई येथे 'एज्युसीटी' निर्माण करण्यात आली असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. जगातील १२ नामवंत विद्यापीठांनी आपापले कॅम्पस एज्युसीटी नवी मुंबई ठिकाणी उघडण्यास मान्यता दिली असून यॉर्क, वेस्टर्न ऑस्ट्रेलिया व इलिनॉईस विद्यापीठांनी अगोदरच तेथे कॅम्पस सुरु केले असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.
नवी मुंबई एज्युसीटी येथे सर्व प्रस्तावित आंतरराष्ट्रीय विद्यापीठांचे कॅम्पस स्थापन झाल्यावर त्याठिकाणी ८०,००० ते एक लाख विद्यार्थ्यांना आंतरराष्ट्रीय दर्जाचे शिक्षण घेता येईल असे मुख्यमंत्री श्री.फडणवीस यांनी सांगितले.
लॉइड्स स्टीलचे व्यवस्थापकीय संचालक प्रभाकरन यांचे कौतुक करून त्यांनी धैर्य दाखविल्यामुळे गडचिरोली येथे एकात्मिक स्टील उद्योग सुरु करणे शक्य झाले असे मुख्यमंत्री श्री.फडणवीस यांनी सांगितले.
स्थापनेपासून अवघ्या १२ - १३ वर्षात गोंडवाना विद्यापीठाने चांगली प्रगती केली असे सांगून विद्यापीठाने तंत्रज्ञान संस्था सुरु केल्यामुळे तसेच कर्टीन विद्यापीठाशी सहकार्य केल्यामुळे संस्थेतून देशात खनिज उद्योग तसेच धातुशास्त्र या विषयातील उत्तम तज्ज्ञ तयार होतील, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.
यावेळी उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, ऑस्ट्रेलियाचे मुंबईतील वाणिज्यदूत पॉल मर्फी, लॉईड्स स्टीलचे व्यवस्थापकीय संचालक बी प्रभाकरन व गोंडवाना विद्यापीठाचे कुलगुरु डॉ प्रशांत बोकारे यांनी मनोगत व्यक्त केले.
गडचिरोली येथे युवकांना धातुशास्त्र, खाणकाम व कॉम्प्युटर सायन्स व अन्य विषयातील अभियांत्रिकी प्रशिक्षण देण्यासाठी स्वायत्त 'विद्यापीठ तंत्रज्ञान संस्था' स्थापन करण्याबाबत गोंडवाना विद्यापीठ व लॉइड्स मेटल्स यांचेमध्ये करार करण्यात आला. तर गोंडवाना विद्यापीठ व पश्चिम ऑस्ट्रेलियातील कर्टीन विद्यापीठ यांचेमध्ये उभयपक्षी पदवी (ट्विनिंग डिग्री) प्रदान करण्याबाबत करार करण्यात आला.
कार्यक्रमाला माजी मंत्री सुधीर मुनगंटीवार, आमदार डॉ.परिणय फुके, कर्टीन विद्यापीठाचे प्रकुलगुरु मार्क ऑग्डन, उच्च व तंत्र शिक्षण विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव वेणुगोपाल रेड्डी, तसेच विद्यापीठाच्या व्यवस्थापन समितीचे सदस्य उपस्थित होते.
००००
No comments:
Post a Comment