राज्यपाल व मुख्यमंत्री यांच्या उपस्थितीत गोंडवाना विद्यापीठ, लॉईड स्टील व कर्टीन विद्यापीठ करार यांचेमध्ये सामंजस्य करार
गडचिरोली लवकरच सर्वाधिक समृद्ध जिल्हा होईल
- राज्यपाल सी पी राधाकृष्णन
आगामी पाच वर्षांमध्ये गडचिरोली देशातील 'स्टील हब' होईल
- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
मुंबई, दि.7 : युवकांना गुणवत्तापूर्ण शिक्षण व कौशल्य प्रदान केल्याशिवाय विकसित भारताचे उद्दिष्ट साध्य करता येणार नाही असे सांगून गडचिरोली येथील गोंडवाना विद्यापीठाने तेथील लॉइड स्टील कंपनी व पश्चिम ऑस्ट्रेलियाच्या कर्टीन विद्यापीठासोबत केलेल्या करारामुळे विद्यापीठामधील शिक्षणाचा दर्जा उंचावून आगामी काळात गडचिरोली जिल्हा सर्वाधिक समृद्ध जिल्हा म्हणून उदयास येईल व जिल्ह्याचा चेहरामोहरा पालटेल, असे प्रतिपादन राज्यपाल तथा कुलपती सी पी राधाकृष्णन यांनी केले.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत गोंडवाना विद्यापीठाचे लॉइड्स मेटल्स व एनर्जी तसेच पश्चिम ऑस्ट्रेलियातील कर्टीन विद्यापीठ यांच्यात राजभवन, मुंबई येथे सांमजस्य करार झाले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी व गृहमंत्री अमित शाह यांच्या नेतृत्वामुळे गडचिरोली तसेच इतर नक्षल प्रभावित भागातील नक्षलवाद पूर्णपणे आटोक्यात आला. त्याच्या फलस्वरूप गडचिरोली येथे विकासाची पहाट होत आहे असे सांगून कोणताही विकास सर्वसमावेशक असल्याशिवाय अपूर्ण असल्याचे राज्यपालांनी सांगितले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नक्षलवादाचा पूर्णपणे बिमोड करण्यासाठी यापुढे देखील कठोर पावले उचलतील असा विश्वास राज्यपालांनी यावेळी व्यक्त केला.
काही महिन्यांपूर्वी आपण माजी मंत्री सुधीर मुनगंटीवार यांचेसह गडचिरोलीचा दौरा केला होता असे सांगून गोंडवाना विद्यापीठाने स्थानिक गरज विचारात घेऊन अभ्यासक्रम आखावे तसेच विद्यार्थ्यांना नोकऱ्या मिळतील हे पाहावे असे राज्यपालांनी सांगितले.
गडचिरोली येथे विपुल खनिज संपदा असून तेथे उत्तम प्रतीचे लोहखनिज आहे. त्याठिकाणी आज धातू व खनिजाच्या शोधन व विनियोगासाठी तज्ज्ञ लोकांची आवश्यकता आहे असे सांगून कर्टीन विद्यापीठाशी सहकार्यामुळे खनिज क्षेत्रातील शिक्षणाची गुणवत्ता सुधारण्यास मदत होईल असे राज्यपालांनी सांगितले.
गोंडवाना विद्यापीठाने लॉईड्स स्टील व एनर्जीच्या सहकार्याने विद्यापीठ तंत्रज्ञान संस्था स्थापन केल्याबद्दल राज्यपालांनी विद्यापीठाचे अभिनंदन केले.
No comments:
Post a Comment