वाळवा तालुक्यातील ४८ गावांच्या
डोंगरी उपगटाची निर्मिती करण्यासाठी पुनर्सर्वेक्षण करावे
- महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे
डोंगरी उपगटाची निर्मिती करीता मंत्रिमंडळ उपसमिती गठीत करणार
मुंबई, दि. १४ : शिराळा विधानसभा मतदारसंघातील वाळवा तालुक्यातील ४८ गावातील डोंगरी उपगटाची निर्मिती करण्यासाठी पुनर्सर्वेक्षण करावे आणि त्याचा अहवाल सादर करावा, असे निर्देश महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिले. डोंगरी उपगटाची निर्मिती करीता मंत्रिमंडळ उपसमिती गठीत करण्यात येईल असेही त्यांनी यावेळी सांगितले.
महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयातील समिती कक्षामध्ये सांगली जिल्ह्यातील शिराळा मतदारसंघातील वाळवा तालुक्यातील समाविष्ट 48 गावातील डोंगरी उपगटाची निर्मिती करणेबाबत बैठक आयोजित करण्यात आली होती, या वेळी मंत्री श्री. बावनकुळे बोलत होते. बैठकीस शिराळा मतदारसंघाचे आमदार सत्यजित देशमुख, महसूल विभागाचे अवर सचिव (भूसंपादन) डॉ.वसंत माने, उपसचिव नितिन खेडेकर, नियोजन विभागाचे उपसचिव आणि संबंधित अधिकारी उपस्थित होते. तसेच सांगली जिल्ह्याचे जिल्हाधिकारी अशोक काकडे, नागपूर येथील महाराष्ट्र सुदूर संवेदन उपयोजना केंद्राचे डॉ.संजय पाटील हे दूरदृश्य प्रणालीद्वारे या बैठकीस सहभागी झाले होते.
महसूल मंत्री श्री. बावनकुळे म्हणाले, शिराळा मतदारसंघातील वाळवा तालुक्यातील समाविष्ट 48 गावांपैकी आठ गावांचा डोंगरी उपगटात समावेश झाला आहे. उर्वरित 40 गावांचा समावेश करण्यासाठी जिल्हाधिकारी यांनी पुनर्सर्वेक्षण करण्यासाठी त्या गावांचा प्रस्ताव महाराष्ट्र सुदूर संवेदन उपयोजना केंद्र (एमआर सॅक), नागपूर यांच्याकडे पाठवावा. एमआर सॅकने या गावांचे पुनसर्व्हेक्षण करुन अहवाल एका आठवड्याच्या आता मंत्रिमंडळ उपसमितीकडे सादर करावा, असे यावेळी सांगितले.
No comments:
Post a Comment