प्रवाशांना ‘बेस्ट’ बसेसची रिअल-टाईम माहिती देणारी सुविधा उपयुक्त
-मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
मुंबई, दि. ७ : मुंबईतील प्रवास आता अधिक सुलभ आणि स्मार्ट होणार आहे. बृहन्मुंबई इलेक्ट्रिक पुरवठा आणि परिवहन उपक्रम (बेस्ट) आणि गुगल यांच्यातील सहकार्यामुळे आता बेस्ट बसेसची रिअल-टाईम माहिती गुगल मॅपवर पाहता येणार आहे. प्रवाश्यांच्या वेळेची बचत करुन त्यांच्या सुलभ प्रवाशांच्या दृष्टीने ही एक उपयुक्त सुविधा उपलब्ध होत असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.
गुगल मॅपवर बसमार्गाची माहिती या प्रणालीचे उद्घाटन मुख्यमंत्री श्री.फडणवीस यांच्या हस्ते झाले. यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपस्थित होते. तसेच मुख्यमंत्री कार्यालयाचे सचिव डॉ. श्रीकर परदेशी, उपमुख्यमंत्री कार्यालयाचे प्रधान सचिव नवीन सोना यांच्यासह संबंधित उपस्थित होते.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, प्रवाशांना इच्छित ठिकाणी जाण्यासाठी कोणत्या वेळी कोणती बस उपलब्ध होईल, ती बस मिळण्याची अचूक वेळ या गोष्टी सहजतेने आता उपलब्ध असणार आहेत, ज्यामुळे प्रवाश्यांच्या वेळेची बचत होईल आणि सोयीस्कर प्रवास करणे त्यांना शक्य होणार आहे. बेस्ट आणि गुगल मॅप यांच्यातील हे सहकार्य मुंबईतील सार्वजनिक वाहतुकीच्या गुणवत्तापूर्ण सुविधेच्या दिशेने एक महत्त्वपूर्ण पाऊल आहे. या सुविधेमुळे ‘बेस्ट’च्या ग्राहकांच्या संख्येतही वाढ होईल. प्रवाश्यांना या सुविधेचा पुरेपूर लाभ घेता यावा यासाठी प्रत्येक बसस्थानकावर या सुविधेबाबतची सविस्तर माहिती उपलब्ध करुन द्यावी,असे मुख्यमंत्री श्री.फडणवीस यांनी यावेळी सांगितले.
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही या डिजिटल उपक्रमाचे स्वागत केले आणि त्याचे कौतुक केले.
No comments:
Post a Comment