महाराष्ट्र राज्य शेती महामंडळाच्या संयुक्त शेतीधारक शेतकऱ्यांना
वीज पुरवठ्यासाठी सौर ऊर्जा प्रकल्प उभारणार
मुंबई दि. २२ :- महाराष्ट्र राज्य शेती महामंडळाच्या संयुक्त शेतीधारक शेतकऱ्यांना वीजपुरवठा होण्यासाठी कमी मेगावॉट क्षमतेचे सौर ऊर्जा प्रकल्प उभारण्यात येतील, यासाठी महाजनको व संबंधित शासकीय उपक्रमांकडून प्रस्ताव मागवून कार्यवाही करण्यात यावी, असे निर्देश महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिले.
मंत्रालयात महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या अध्यक्षतेखाली महाराष्ट्र राज्य शेती महामंडळाच्या विविध विषयांशी संबंधित बैठक झाली. यावेळी महसूल राज्यमंत्री योगेश कदम, विभागाचे अपर मुख्य सचिव राजेश कुमार, महाजनकोचे अध्यक्ष बी. राधाकृष्णन, महसूल विभागाचे सहसचिव अजित देशमुख, शेती महामंडळ, ऊर्जा व महसूल विभागाचे अधिकारी उपस्थित होते.
शेती महामंडळाच्या जमिनी करार पद्धतीने शेती शेतकऱ्यांना देण्यात आल्या असून त्या ठिकाणी महावितरणकडून वीज पुरवठा केल्यास जास्त खर्च येऊ शकतो असे निदर्शनात आले आहे. या शेतकऱ्यांना मुख्यमंत्री सौर कृषी योजनेतून वीज उपलब्ध करुन देण्यासाठी सौर ऊर्जा प्रकल्प उभारण्यात येतील. यासाठी ही योजना पूर्ण करण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पाठपुरावा करण्यात येणार असल्याचे मंत्री श्री.बावनकुळे यांनी सांगितले.
राज्य शेती महामंडळाच्या जमिनी संयुक्त शेतीसाठी विविध ठिकाणी देण्यात आल्या आहेत. यासह महामंडळाच्या जमिनीवर सौर ऊर्जा प्रकल्प आणि सोलार पार्क निर्मितीसाठी देखील जागा निश्चित केली जावी, अशा सूचना महसूल मंत्री श्री. बावनकुळे यांनी दिल्या.
0000
No comments:
Post a Comment