पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या त्रिशताब्दी जयंती
उत्सवाचे राष्ट्रपतींना निमंत्रण
- विधान परिषद सभापती प्रा.राम शिंदे
नवी दिल्ली, दि. 21 : पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या त्रिशताब्दी जयंती उत्सवाचे निमंत्रण राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना देण्यात आल्याची माहिती विधान परिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे यांनी पत्रकार परिषदेत दिली.
दरवर्षी 31 मे रोजी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची जन्म जयंती साजरी केली जाते. यंदा पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची 300 वी जयंती त्यांच्या जन्म गावी अहिल्यानगर जिल्ह्यातील जामखेड तालुक्यातील चौंडी येथे भव्य स्वरूपात साजरी होणार आहे. त्याचे निमंत्रण राष्ट्रपती यांना देण्यासाठी आज सभापती प्रा.शिंदे आले असून राष्ट्रपती श्रीमती मुर्मू यांच्या भेटीनंतर त्यांनी महाराष्ट्र सदन येथे आयोजित पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. यावेळी सांगली महानगरपालिकेच्या महापौर संगिता खोत, ॲड. वीणा सोनवलकर, डॉ. उज्वला हाके, डॉ. स्मिता काळे, मानिका गहानवर उपस्थित होत्या.
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे कार्य महान आहे. त्या काळात समाजातील रूढी पंरपरेला झुगारून त्यांनी धर्माचे, संस्कृतीचे रक्षण केले. देशभरातील 12 ज्योर्तिलिंगांचा जीर्णोद्धार त्यांनी केला. काशी विश्वनाथ मंदिराची पुर्नबांधणी, अनेक ऐतिहासिक धार्मिक स्थळांवरील घाटांचे निर्माण, विहीरींचे बांधकाम, रस्त्यांच्या कडेवरील वृक्षारोपण असे अनेक कामे त्यांच्या हातून घडलीत, अशी माहिती सभापती प्रा.शिंदे यांनी यावेळी सांगितली. चौंडी या त्यांच्या जन्मगावी होणाऱ्या जयंती महोत्सवाच्या कार्यक्रामात यापूर्वी राष्ट्रपती शंकरदयाळ शर्मा, लोकसभा सभापती सुमित्रा महाजन, राज्याचे मुख्यमंत्री, अनेक केंद्रीय मंत्री आल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.
याच महिन्यात 6 मे 2025 रोजी अहिल्यानगर येथे मंत्रिमंडळाची विशेष बैठक आयोजित करण्यात आली. यावेळी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सहकारी सूत गिरणी व मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेंतर्गत चौंडी ते निमगाव डाकू रस्त्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे हस्ते भूमिपूजन करण्यात आले. चौंडी शिवारात उभारण्यात येत असलेल्या या सूतगिरणीसाठी ९१ कोटी रुपये निधीची तरतूद करण्यात आलेली आहे. चौंडी ते निमगाव डाकू २.७०० कि.मी. लांबीचा रस्ता होणार आहे. राज्य शासनाने ३ कोटी ९४ लक्ष एवढ्या खर्चास मान्यता दिलेली आहे, असे सभापती प्रा.शिंदे यांनी यावेळी सांगितले.
No comments:
Post a Comment