क्रांतिवीर चाफेकर बंधूचे स्मारक युवकांना देशभक्तीचे संस्कार देणारे केंद्र ठरेल
- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
मुख्यमंत्र्यांच्या हस्ते चिंचवड येथील क्रांतीवीर चापेकर स्मारकाचे लोकार्पण
पुणे, दि. १८ : 'हुतात्मांच्या कार्यातून देशभक्तीची प्रेरणा मिळत असते. चापेकर बंधु अशाच हुतात्मांपैकी एक होते. स्वातंत्र्य लढ्यात त्यांनी दिलेले योगदान अमूल्य आहे. त्यांचे कार्य चापेकर स्मारकाच्या माध्यमातून नागरिकांसमोर येणार आहे. हे केंद्र खऱ्या अर्थाने युवकांना देशभक्तीचे संस्कार देणारे ठरेल. हे स्मारक उभारताना तंत्रज्ञानाचा अतिशय उत्तमरित्या वापर करण्यात आला असून ते केवळ पिंपरी चिंचवडसाठी मर्य़ादित न राहता महाराष्ट्राच्या वैभवात भर घालणारे ठरेल,’ असे प्रतिपाद मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.
पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने आणि क्रांतीवीर चापेकर स्मारक समितीच्या सहकार्याने उभारण्यात आलेल्या क्रांतीवीर चापेकर स्मारकाचे लोकार्पण व राष्ट्रीय संग्रहालयाच्या कामाचा शुभारंभ मुख्यमंत्री श्री.फडणवीस यांच्या हस्ते झाला. याप्रसंगी ते बोलत होते.
चिंचवड येथील प्रा. रामकृष्ण मोरे प्रेक्षागृह येथे झालेल्या या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी उपमुख्यमंत्री तथा पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार होते. यावेळी उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत दादा पाटील, पणन व राजशिष्टाचार मंत्री जयकुमार रावल, विधानसभा उपाध्यक्ष अण्णा बनसोडे, खासदार श्रीरंग बारणे, आमदार उमा खापरे, अमित गोरखे, महेश लांडगे, शंकर जगताप, प्रशांत बंब, माजी खासदार विनय सहस्त्रबुद्धे, अमर साबळे, क्रांतीवीर चापेकर स्मारक समितीचे अध्यक्ष पद्मश्री गिरीश प्रभुणे, पुणे विभागीय आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार, जिल्हाधिकारी जितेंद्र डूडी, क्रांतीवीर चापेकर यांचे वंशज प्रशांत चापेकर, प्रतिभा चापेकर, स्मिता चापेकर, चेतन चापेकर, मानसी चापेकर, जान्हवी जोशी, स्वराज्याचे सरसेनापती हंबीराव मोहिते यांचे वंशज विक्रमसिंह मोहिते, आद्य क्रांतीवीर राजे उमाजी नाईक यांचे वंशज चंद्रकांत खोमणे नाईक, अमोल खोमणे नाईक, विशाल खोमणे नाईक, हुतात्मा राजगुरू यांचे वंशज सत्यशील राजगुरू उपस्थित होते. मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांच्या हस्ते चापेकरांच्या वंशांजाचा सन्मान यावेळी करण्यात आला.
मुख्यमंत्री श्री. फडणवीस पुढे म्हणाले, ‘चापेकर वाडा येथे उभारण्यात येत असलेले स्मारक अतिशय सुंदर आहे. आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून या स्मारकात चापेकर बंधू यांच्या जीवनाशी संबंधित एकूण १४ प्रसंग आहेत.' चापेकर बंधूनी केलेल्या रँडच्या वधाबद्दल सविस्तर माहितीही यावेळी त्यांनी दिली.
‘छत्रपती शिवाजी महाराज यांच्या विचारांची प्रेरणा चापेकर बंधूनी घेतली होती. चापेकर वाडा येथे उभारण्यात आलेले स्मारक हे लवकरच राष्ट्रीय स्मारक होणार आहे. भारताचा सूवर्णमय इतिहास या स्मारकात पाहण्यास मिळेल, या स्मारकात दृकश्राव्य माध्यमातून त्या काळातील प्रसंग आपल्याला समजून घेता येतो असेही मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी सांगितले.
उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले की, क्रांतीवीर चापेकर स्मारकाचे बांधकाम अतिशय अप्रतिम केले आहे. या वाड्याच्या पुनर्बांधणीमुळे देशभक्तीचा नवा हुंकार पेटला आहे. क्रांतीवीर चापेकर स्मारकाच्या उद्घाटनाचा हा क्षण देशभरातील जनतेसाठी अभिमानाचा, स्वाभिमानाचा आणि आनंदाचा क्षण असून ब्रिटिश सरकारच्या अन्यायाविरोधात केलेल्या एल्गाराची आठवण आहे. समाजसुधारकांच्या आणि क्रांतिकारकांच्या सेवा, त्याग समर्पणातून आपला देश घडला आहे. त्यांच्यामुळे मिळालेले स्वातंत्र्य अखंड राखणे, संविधानिक मूल्यांचे संरक्षण करणे, विविधतेमध्ये असलेली एकता जपणे, हे आपले कर्तव्य आहे. देशाच्या स्वातंत्र्यलढ्याचे नेतृत्व महाराष्ट्राने नेहमीच केलेले आहे. तसेच आपल्या देशासाठी बलिदान दिलेल्या चापेकर बंधु, भगतसिंग, राजगुरू, सुखदेव यांचे बलिदान आपण कायम लक्षात ठेवले पाहिजे. न्याय, समता, बंधुता, स्वातंत्र्य, समानता या संविधानिक मूल्यांची जपणूक करून ती मूल्ये पुढच्या पिढीपर्यंत पोहोचविणे हे आपल्या सर्वांचे कर्तव्य आहे,’ असेही त्यांनी सांगितले.
No comments:
Post a Comment