जलनि:स्सारण चर योजनेसाठी नवीन तंत्रज्ञानाचा वापर करणार
- जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील
मुंबई, दि. २० :- मोठ्या व मध्यम प्रकल्पाच्या लाभक्षेत्रात उद्भवणाऱ्या पाणथळ व क्षारयुक्त जमिनीच्या समस्या सोडविण्यासाठी व या क्षेत्राच्या सुधारण्यासाठी जलनिस्सारण चर योजनेसाठी नवीन तंत्रज्ञानाचा वापर करणार, असे जलसंपदा (गोदावरी व कृष्णा खोरे विकास महामंडळ) मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांनी सांगितले.
सदस्य डॉ. विश्वजीत कदम यांनी यासंदर्भात लक्षवेधी उपस्थित केली होती. लक्षवेधीच्या चर्चेत सदस्य जयंत पाटील यांनी सहभाग घेतला
जलसंपदा मंत्री श्री. विखे पाटील यांनी सांगितले की, जलनिस्सारण चर योजना हा कार्यक्रम पाटबंधारे संशोधन व विकास संचालनालय यांच्यामार्फत राबविण्यात येत आहे. पाणथळ व क्षारयुक्त जमिनीचे क्षेत्र निश्चित करण्यासाठी विहिरींची पाणीपातळी घेऊन तसेच जमिनींचे माती परीक्षण करून पाणथळ व क्षारपड जमिनी निश्चित करण्यात येते. त्यानुसार क्षारपड, पाणथळ क्षेत्र निर्मूलनासाठी खुल्या चर योजना प्रस्तावित केल्या जातात. या कार्यक्रमामुळे महाराष्ट्रातील विविध प्रकल्पांच्या लाभक्षेत्रामध्ये ७९९ (२८८२.५४ किमी) योजनांची बांधकामे पूर्ण करण्यात आली आहेत. यामुळे २ लाख २३ हजार १०५ हेक्टर क्षेत्र संरक्षित झाले आहे.
कृष्णा कालव्याच्या लाभ क्षेत्रामध्ये कराड, वाळवा, पलूस व तासगाव या चार तालुक्यांचा समावेश आहे. कृष्णा कालव्याच्या लाभक्षेत्रात ३३ खुल्या चर योजनांची कामे पूर्ण झाली आहेत. यापैकी पलूस तालुक्यात १८ योजना पूर्ण झाल्या असून त्या कार्यान्वित आहेत. या १८ चर योजनांमुळे पलूस तालुक्यातील ३ हजार ३१२ हेक्टर क्षेत्र संरक्षित झाले असल्याचेही त्यांनी सांगितले.
००००
No comments:
Post a Comment