मुंबई महानगर क्षेत्रातील पायाभूत सुविधा विकासासाठी
४ लाख ७ हजार कोटींचे विविध सामंजस्य करार
एमएमआर क्षेत्राच्या आणि पुण्याच्या विकासाला मिळणार मोठा बुस्टर
- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
पुण्यात मॅग्नम आइस्क्रीमचे जीसीसी साठीही करार
मुंबई, दि. ८ : मुंबई महानगर विकास प्राधिकरण क्षेत्राच्या पायाभूत सुविधा विकासासाठी करण्यात आलेल्या ४ लाख ७ हजार कोटींच्या सामंजस्य करारामुळे या क्षेत्राच्या विकासाला मोठा बुस्टर मिळणार असल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांनी केले.
वांद्रे कुर्ला संकुल येथील जियो वल्ड सेंटर येथे आयोजित इंडिया ग्लोबल फोरम २०२५ या कार्यक्रमामध्ये विविध सामंजस्य करार करण्यात आले. त्यावेळी मुख्यमंत्री फडणवीस बोलत होते.
एमएमआर क्षेत्रामध्ये मोठी आर्थिक क्षमता असल्याचे सांगून मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, एकट्या एमएमआर क्षेत्रामध्ये दीड ट्रिलियन डॉलर अर्थव्यवस्थेची क्षमता आहे. आज झालेल्या सामंजस्य करारामुळे या क्षेत्रातील पायाभूत सुविधांच्या उभारणीस मोठ्या प्रमाणावर निधी उपलब्ध होणार आहे. तसेच युनिलिव्हर कंपनी सोबत झालेल्या करारामुळे पुण्याच्या विकासासाठी फायदा होणार आहे. पुणे शहरात मोठ्या संधी आहेत. या करारामुळे या संधीमध्ये वाढ होऊन रोजगार निर्मिती सोबतच आंतरराष्ट्रीय स्तरावर पुण्याचे स्थान उंचावणार आहे.
एमएमआरडीए आणि हुडको यांच्या मध्ये पायाभूत सुविधा विकासासाठी दीड लाख कोटी रुपयांचा करार करण्यात आला. तसेच आर. ई. सी. सोबत एक लाख कोटी, पी. एफ. सी. सोबत एक लाख कोटी, आय आर एफ सी ( इंडियन रेल्वे फायनान्स कॉर्पोरेशन) सोबत एक लाख कोटी आणि नॅशनल बँक फॉर फायनान्सिंग इन्फ्रास्ट्रकचर अँड डेव्हलपमेंट यांच्या सोबत ७ हजार कोटींचा असे एकूण ४ लाख ७ हजार कोटींचे करार करण्यात आले. तसेच युनिलिव्हर कंपनीच्या मॅग्नम आइस्क्रीम व्यापारासाठीचे ग्लोबल कापॅबिलिटी सेंटर पुणे येथे उभारण्याचा सामंजस्य करारही करण्यात आला. या केंद्रामध्ये ९०० कोटी रुपयांची गुंतवणूक होणार असून ५०० रोजगार उपलब्ध होणार आहेत.
यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, हुडकोचे अध्यक्ष संजय कुलक्षेत्र, आर ई सी आणि पी एफ सीचे अध्यक्ष परमिंदर चोप्रा, आय. आर. एफ. सी. चे संचालक शेली वर्मा, एन. ए. बी. एफ. आय. डी. चे व्यवस्थापकीय संचालक राजकिरण राय, मॅग्नम आइस्क्रीम कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी अभिजित भट्टाचार्य, उद्योग विभागाचे सचिव पी. अनबलगम आदी उपस्थित होते.
००००
No comments:
Post a Comment