पद्मदुर्गचा समावेश गडकोट किल्ले संवर्धन योजनेत करणार
मुरुड तालुक्यातील पद्मदुर्ग किल्याचं ऐतिहासिक महत्त्व लक्षात घेऊन या किल्ल्याचा समावेश गडकोट किल्लेसंवर्धन योजनेत करण्याचा प्रस्ताव सादर करण्याचे निर्देश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले. छत्रपती शिवाजी महाराजांनी बांधलेला पद्मदूर्ग किल्ला बघण्याची अनेक इतिहासप्रेमी व पर्यटकांची इच्छा असते, जेट्टीचा अभाव आणि पुरेशा सोयींअभावी त्यांना पद्मदूर्ग किल्ल्यावर जाता येत नाही. त्यासाठी पद्मदूर्ग किल्ल्यावर जाण्यासाठी पर्यटनजेट्टी उभारण्याचा प्रस्ताव केंद्र सरकारकडे विचाराधीन आहे. त्यास केंद्र शासनाच्या पूरातत्व विभागाकडून मंजूरी मिळवण्याची कार्यवाही तातडीने पूर्ण करावी, असे निर्देशही उपमुख्यमंत्र्यांनी दिले. मुरुड किल्ला परिसर आणि राजापूरी ग्रामपंचायत क्षेत्रातील अडचणी सोडवण्यासंदर्भात तसेच श्रीवर्धन तालुक्यातील दिवेआगर येथे केंद्र शासन पुरस्कृत स्वदेश दर्शन योजनेतून मत्स्यालय, पर्यटक निवारा केंद्र उभारण्याबाबतही बैठकीत चर्चा करण्यात आली. यासंदर्भात आवश्यक कार्यवाही करण्याचे निर्देश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी संबंधित विभागांचे अधिकारी तसेच रायगडचे जिल्हाधिकारी आणि विभागीय आयुक्तांना दिले आहेत.
No comments:
Post a Comment