युवा पिढीने योगाचा अंगीकार करून
शारीरिक आणि मानसिक आरोग्य जपावे
- उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील
उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांची ‘अंतर योग फाउंडेशन’ ला सदिच्छा भेट
मुंबई, दि. 9 : आजच्या धावपळीच्या जीवनशैलीत आणि वाढलेल्या स्पर्धेत युवा पिढीला आणि महिलांना ताणतणावाचा सामना करावा लागत आहे. या पार्श्वभूमीवर युवा पिढीने योगाचा अंगीकार करून शारीरिक व मानसिक आरोग्य जपावे, असे आवाहन उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी केले.
उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी 'अंतर योग फाउंडेशन' ला सदिच्छा भेट दिली. या भेटीदरम्यान त्यांनी अंतर योग फाउंडेशन उपक्रमांची माहिती घेतली. तसेच फाउंडेशनद्वारे योग आणि मानसिक आरोग्यविषयक सुरू असलेल्या कार्याचे कौतुक केले.
मंत्री पाटील म्हणाले, या संस्थेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना, महिलांना आणि युवापिढीला योग व आध्यात्मिकतेच्या मार्गाकडे प्रवृत्त करून त्यांना मानसिकदृष्ट्या अधिक सक्षम करणे गरजेचे आहे. आजच्या काळात मानसिक आरोग्य ही महत्त्वाची बाब असून, अशा उपक्रमांमुळे समाजात सकारात्मक बदल घडू शकतो.
यावेळी अंतर योग फाउंडेशनचे संस्थापक व अध्यात्मिक गुरु आचार्य उपेंद्रजी आणि अंतर योग फाउंडेशनचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
००००
काशीबाई थोरात/विसंअ/
वृत्त क्र. १५२८
प्रधानमंत्र्यांच्या उपस्थितीत ‘विश्व नवकार महामंत्र दिवसाचे आयोजन’;
विश्वकल्याणासाठी नवसुत्री अंगीकारण्याचे प्रधानमंत्र्यांचे आवाहन
मुंबई येथे राज्यपालांच्या उपस्थितीत विश्व नवकार महामंत्र दिन संपन्न
मुंबई, दि. 9 : ‘विश्व नवकार महामंत्र’ दिनाचे औचित्य साधून प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या प्रमुख उपस्थितीत विज्ञान भवन नवी दिल्ली येथे एका कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. जगातील अनेक देशात आयोजित या कार्यक्रमाला प्रधानमंत्री यांनी यावेळी संबोधित केले.
तर, मुंबई येथे 'विश्व नवकार महामंत्र दिन' महाराष्ट्राचे राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांच्या प्रमुख उपस्थितीत एनएससीआय डोम वरळी, मुंबई येथे सामूहिक मंत्रजपाच्या माध्यमातून साजरा करण्यात आला.
आपल्या भाषणातून प्रधानमंत्री यांनी देशवासियांना नऊ संकल्प करण्याचे आवाहन केले. पाण्याचा प्रत्येक थेंब वाचवा, आईच्या नावाने एक वृक्ष लावा, स्वच्छता पाळा, स्थानिक उत्पादनांचा अधिकाधिक वापर करा, देशातील विविध प्रेक्षणीय स्थळांना भेटी द्यावी, सेंद्रिय शेतीला चालना द्यावी, निरामय जीवनशैली अंगीकारावी, श्रीअन्नाचा अधिक वापर करावा, योग आणि क्रीडा यांना जीवनात स्थान द्यावे तसेच गोर-गरिबांना मदत करावी, असे आवाहन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी यावेळी केले.
मुंबईत आयोजित कार्यक्रमामध्ये बोलताना राज्यपाल राधाकृष्णन यांनी नवकार महामंत्र हा केवळ शब्द - अक्षरांचा समूह नसून तो अरिहंत, सिद्ध, आचार्य, उपाध्याय आणि सर्व साधू आदी ज्ञानी आत्म्यांचा सन्मान करणारा प्रभावी मंत्र असल्याचे सांगितले.
नवकार महामंत्र दिनानिमित्त प्रतिक्रियेपेक्षा चिंतनाला, मतभेदापेक्षा एकतेला आणि संघर्षापेक्षा शांततेला महत्व देण्याचे आवाहन राज्यपालांनी यावेळी केले.
मुंबईतील कार्यक्रमाला कौशल्य विकास मंत्री मंगलप्रभात लोढा, गच्छाधीपती नित्यानंद सुरी, आचार्य के. सी. महाराज, आचार्य नय पद्मसागरजी महाराज, मुनी विनम्र सागरजी, आचार्य डॉ. लोकेश मुनी, अखिल भारतीय भिक्खू संघाचे अध्यक्ष भदंत राहुल बोधी महाथेरो, जैन इंटरनॅशनल ट्रेड ऑर्गनायझेशन (जिटो) चे पदाधिकारी, जैन समाजाचे प्रतिनिधी आदी उपस्थित होते.
विश्व नवकार महामंत्र दिनाचे आयोजन जैन इंटरनॅशनल ट्रेड ऑर्गनायझेशन 'जिटो' या संस्थेतर्फे करण्यात आले होते.
No comments:
Post a Comment