रायगड जिल्ह्यात विविध प्रकल्प, विकासकामांना गती देण्यासाठी
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली महत्वपूर्ण बैठक
मंत्री आदिती तटकरे, खासदार सुनील तटकरे यांची विशेष उपस्थिती
जामगावच्या डॉ. सी. डी. देशमुख जैवविविधता, वनउद्यानाचा विकास करणार
मौजे तिसे येथील केदारजननी माता देवस्थानाच्या रोपवे निर्मितीचा प्रस्ताव
मौजे संभे गावाचे सुरक्षित स्थलांतर व पुनर्वसनाची कार्यवाही तातडीने होणार
गिरणे येथे खारभूमी संशोधन केंद्राच्या उभारणीचा मार्ग मोकळा
दिवेआगर येथे स्वदेश दर्शन योजनेतून मत्स्यालय, पर्यटक निवारा केंद्र
पद्मदुर्ग किल्याचा गडकोट किल्लेसंवर्धन योजनेत समावेश करण्याचा प्रस्ताव
मुरुड किल्ला आणि राजापूरी क्षेत्रातील अडचणी सोडवण्याबाबत चर्चा
मुंबई, दि. ८ :- रायगड जिल्ह्याच्या रोहा तालुक्यातील जामगाव येथे उभारण्यात येत असलेल्या डॉ. सी. डी. देशमुख जैवविविधता, वने व उद्यान प्रकल्पात राखीव वने तसेच निसर्ग पर्यटनस्थळांच्या विकासाचा ८० कोटींचा सुधारित प्रस्ताव तात्काळ सादर करावा. वित्त विभाग प्रस्तावाची पडताळणी करुन त्वरित मान्यता देईल तसेच आवश्यकतेनुसार निधी उपलब्ध केला जाईल. उपलब्ध ३० कोटींच्या निधीतून सध्या सुरु असलेली कामे तातडीने पूर्ण करावीत, असे निर्देश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी रायगड जिल्ह्यातील विविध विकासकामांना गती देण्यासाठी मंत्रालयात आयोजित बैठकीत दिले.
रायगड जिल्ह्यातील विकासकामांबाबत बैठकीत चर्चा
रायगड जिल्ह्याच्या रोहा तालुक्यातील जामगाव येथील डॉ. सी. डी. देशमुख जैवविविधता, वने व उद्यान प्रकल्पातील विकासकामे, रोहा तालुक्यातील मौजे तिसे येथील केदारजननी माता देवस्थानाच्या ठिकाणी रोपवेची उभारणी करणे, रोहा तालुक्यातील मौजे संभे या दरडप्रवण गावाचे सुरक्षिततेच्या कारणास्तव पुनर्वसन करणे, तळा तालुक्यात गिरणे येथे डॉ. बाळासाहेब सावंत कृषी विद्यापीठांतर्गत खारभूमी संशोधन केंद्राची उभारणी, श्रीवर्धन तालुक्यातील दिवेआगर येथे केंद्र शासन पुरस्कृत स्वदेश दर्शन योजनेतून मत्स्यालय, पर्यटक निवारा केंद्राची निर्मिती, मुरुड तालुक्यातील पद्मदुर्ग किल्याचा समावेश गडकोट किल्लेसंवर्धन योजनेत करण्यासह मुरुड किल्ला परिसर आणि राजापूरी ग्रामपंचायत क्षेत्रातील अडचणी सोडवण्यासंदर्भात आज एका विशेष बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित बैठकीला महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे, कृषीमंत्री माणिकराव कोकाटे, खासदार सुनील तटकरे, नियोजन विभागाचे अपर मुख्य सचिव राजगोपाल देवरा, सांस्कृतिक कार्य विभागाचे अपर मुख्य सचिव विकास खारगे, नगरविकास विभागाचे अपर मुख्य सचिव असीमकुमार गुप्ता, मदत व पुनर्वसन विभागाच्या अपर मुख्य सचिव डॉ. सोनीया सेठी, वित्त विभागाचे प्रधान सचिव सौरव विजय, उपमुख्यमंत्री कार्यालयाचे सचिव डॉ. राजेश देशमुख, पर्यटन विभागाचे प्रधान सचिव अतुल पाटणे, सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक विजय सिंघल, कोकणचे विभागीय आयुक्त डॉ. विजय सुर्यवंशी, रायगडचे जिल्हाधिकारी किशन जावळे आदींसह शासनाच्या संबंधित विभागांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
No comments:
Post a Comment