एका वर्षात राज्यात 85 हजार पेक्षा जास्त रिक्त पदांची भरती पूर्ण;
रिक्तपदे भरण्याची प्रक्रिया निरंतर सुरू
- माहिती व तंत्रज्ञान मंत्री आशिष शेलार
मुंबई, दि. 19 : राज्यात गेल्या एका वर्षात 85 हजार 363 उमेदवारांची भरती प्रक्रिया पूर्ण करून त्यांना नियुक्त्याही देण्यात आल्याची माहिती मंत्री ॲड आशिष शेलार यांनी विधानपरिषदेमध्ये दिली.
सदस्य विक्रम काळे यांनी अर्धातासाच्या चर्चेदरम्यान उपस्थित केलेल्या प्रश्नाला उत्तर देताना माहिती व तंत्रज्ञान मंत्री शेलार बोलत होते.
राज्यातील गट अ आणि गट ब मधील पदांची भरती ही महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगामार्फत होत असल्याचे सांगून माहिती व तंत्रज्ञान मंत्री शेलार म्हणाले की, आता राज्य शासनाने गट क मधील काही पदांच्या भरतीचे अधिकारही एमपीएससीकडे दिले आहेत. देशाच्या स्वातंत्र्याच्या 75 व्या वर्षा निमित्त राज्य शासनाने 75 हजार पदांची भरती करण्याची घोषणा केली. या अनुषंगाने राज्यात 85 हजार पेक्षा जास्त पदांची भरती प्रक्रिया एक वर्षाच्या आत पूर्ण करण्यात आली आहे. तसेच एमपीएससी सदस्यांची रिक्त असेलेली तीन पदे भरण्याची कार्यवाहीही सुरू आहे. भरती प्रक्रियेवर कोणत्याही प्रकारची बंदी नसून भरती प्रक्रिया ही निरंतर चालणारी प्रक्रिया आहे. शासनातील रिक्त पदांची माहिती एमपीएससीकडे वेळोवेळी सादर करून ही भरती प्रक्रिया राबवली जाते. आताही अनेक पदांच्या जाहिराती प्रसिद्ध झाल्या असून त्याविषयी प्रक्रिया सुरु आहे. तसेच निवृत्तीमुळे निर्माण होणाऱ्या रिक्त पदांच्या भरतीबाबतही शासन निर्णय घेऊन प्रक्रिया राबवत आहे. तसेच आतापर्यंत अनेक विभागांमध्ये रखडलेल्या पदोन्नतीच्या प्रक्रियाही शासनाने मार्गी लावल्या आहेत. त्यामुळे रिक्त पदांच्या भरतीबाबतही संबंधित विभागांना सूचना देण्यात येतील. तसेच नियमीत पदावर कंत्राटी भरती करण्याचे कोणतेही आदेश शासनाने निर्गमित केलेले नसून अशा प्रकारे भरती झाली असल्यास त्याची चौकशी करण्यात येईल, असेही श्री शेलार यांनी सांगितले.
No comments:
Post a Comment