Thursday, 17 April 2025

मेट्रो मार्ग 7 अ मधील भुयारी बोगद्याचे ' ब्रेक थ्रू ' यशस्वीरित्या पूर्ण

 मेट्रो मार्ग 7 अ मधील भुयारी बोगद्याचे ब्रेक थ्रू यशस्वीरित्या पूर्ण

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची उपस्थिती

 

मुंबईदि. १७: मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणामार्फत प्रस्तावित छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ (टी २) ते अंधेरी पूर्व या मेट्रो मार्ग ७ अ मधील १.६५ किलोमीटर लांबीच्या भुयारी बोगद्याचे ब्रेक थ्रू मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत यशस्वीरित्या पूर्ण करण्यात आले.  यावेळी कौशल,रोजगार, उद्योजकता व नावीन्यता विभागाचे मंत्री मंगल प्रभात लोढाआमदार पराग अळवणीमुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाचे महानगर आयुक्त संजय मुखर्जीअतिरिक्त महानगर आयुक्त अश्विन मुदगल आदी उपस्थित होते. 

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सुरुवातीला संबंधित अधिकाऱ्यांकडून  प्रकल्पाविषयी माहिती जाणून घेतली. तसेच कळ दाबून ब्रेक थ्रू कामाला सुरुवात केली. यानंतर या कामाची पाहणी केली. हा भुयारी बोगदा मेट्रो ७ अ वर डाऊनलाईन वर आहे. छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ स्टेशन ते एअरपोर्ट कॉलनी स्टेशन दरम्यान हा बोगदा असणार आहे.  ही मेट्रो जोडणे मुंबई महानगर प्रदेशातील एकूण मेट्रो जाळ्यासाठी महत्त्वाचा टप्पा असणार आहे. या मेट्रो मार्गामुळे मुंबई महानगर क्षेत्रातील मीरा-भाईंदर व पुढे वसई - विरार हा भाग छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळासोबत मेट्रोने जोडले जातील. तसेच ठाणे व नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ सुद्धा मेट्रो ने जोडण्यात येईल. या मेट्रो मार्गाचे ५९ टक्के काम पूर्ण झाले आहे. 

मेट्रो मार्ग ७ अ विषयी..

या मेट्रो मार्गाची लांबी ३.४  किलोमीटर असून त्यापैकी उन्नत मार्ग ०.९४ किलोमीटर आणि भूमिगत २.५० किलोमीटर आहे. या मार्गावर दोन स्थानके असणार आहेत. एक स्थानक उन्नत मार्गावर एअरपोर्ट कॉलनी तर दुसरे स्थानक भूमिगत छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ येथे असणार आहे.  उन्नत मेट्रो मार्ग ०.५७ किलोमीटर असेल दुहेरी बोगद्याची लांबी २.०३५  किलोमीटर आहे. १ सप्टेंबर २०२३ रोजी डाउनलाईन बोगद्याचे पहिले ड्राईव्ह सुरू झाले. या बोगद्याची लांबी १.६५ किलोमीटर असून लाइनिंगसाठी ११८० रिंग्स बसविण्यात आल्या आहेत.  बोगद्याचा व्यास ६.३५ मीटर एवढा असून सहा भागात विशेष डिझाईन असलेल्या प्रिकास्ट रिंग वापरण्यात आल्या आहेत.

 सप्टेंबर २०२३ मध्ये टीबीएम मशीन जमिनीपासून ३० मीटर खाली भूगर्भात उतरवण्यात आली. मेट्रो मार्ग तीनच्या वरूनसहार उन्नत रस्त्यांच्या पायाखालून,  मोठ्या सांडपाणी वाहिन्या व जलवाहिन्यांना क्रॉस करून विविध अडचणींवर मात करून या बोगद्याचा ब्रेक थ्रू पूर्ण करण्यात आला. या मेट्रो मार्गामुळे मुंबईकरांना कुलाबा ते वसई विरारमीरा भाईंदर पर्यंत  आरामदायी प्रवास अनुभवता येणार आहे. 

या मार्गामुळे मुंबई महानगर प्रदेशातील विविध मेट्रोमार्ग थेट विमानतळापर्यंत मेट्रोने जोडले जातील. मेट्रोमार्ग ३ (कुलाबा-वांद्रे-सीप्झ) च्या छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ या भूमिगत स्थानक मार्गासोबत सुलभ संलग्न करणे शक्य होईल.  प्रवाशांसाठी सुरक्षित आरामदायी व सुलभ प्रवास शक्य होणार आहे.  दाटीवाटीच्या नागरी परिसरातून मेट्रोसाठी उन्नत व भूमिगत मार्गाची रचना केल्यामुळे विमानतळ परिसरात मेट्रो बांधकामासाठी कमी जागा व्यापली जाणार आहे.

00000

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi