चांदोली व्याघ्र प्रकल्पातून गाव वगळण्यासाठी केंद्र शासनाकडे पाठपुरावा करणार
- वनमंत्री गणेश नाईक
मुंबई, दि. २० : सांगली जिल्ह्यातील चांदोली अभयारण्याला सह्याद्री व्याघ्र प्रकल्प म्हणून घोषित करण्यात आले आहे. या व्याघ्र प्रकल्पात असलेल्या खुंदलापूर, धनगरवाडी या गावांना व्याघ्र प्रकल्पातून वगळण्याबाबत केंद्र शासनाकडे पाठपुरावा करण्यात येईल, असे वनमंत्री गणेश नाईक यांनी विधानसभेत लक्षवेधी सूचनेच्या उत्तरात सांगितले.
याबाबत सदस्य सत्यजित देशमुख यांनी लक्षवेधी सूचना उपस्थित केली होती. या लक्षवेधी सूचनेच्या चर्चेत सदस्य गोपीचंद पडळकर यांनीही सहभाग घेतला.
लक्षवेधी सूचनेच्या उत्तरात मंत्री श्री. नाईक म्हणाले, वन्यजीव संरक्षण अधिनियम १९७२ नुसार चांदोली अभयारण्य घोषित करण्यात आले. दुसऱ्या टप्प्यात राष्ट्रीय उद्यान आणि तिसऱ्या टप्प्यात सह्याद्री व्याघ्र प्रकल्प म्हणून घोषित झाले आहे. व्याघ्र प्रकल्पाची सीमा बदलण्याचा अधिकार केंद्र शासनाला आहे. या व्याघ्र प्रकल्पातील गावे वगळण्यासाठी राज्य वन्यजीव मंडळाची मान्यता घेण्यात येईल. त्यानंतर हा प्रस्ताव मान्यतेसाठी राष्ट्रीय वन्यजीव मंडळाकडे पाठविला जाईल. शासन याबाबत पाठपुरावा करून सकारात्मक निर्णय घेईल.
जोपर्यंत ही कारवाई पूर्ण होत नाही, तोपर्यंत चांदोली व्याघ्र प्रकल्पात येणाऱ्या धनगरवाडी येथील नागरिकांच्या गुराढोरांना कुठल्याही पद्धतीचा त्रास होणार नाही. शेतकऱ्यांना त्रास होणार नाही. तसेच अमानवीय वागणूक मिळणार नाही, याची दक्षता घेण्यात येईल. त्या पद्धतीने वन विभागाच्या अधिकाऱ्यांना सूचना देण्यात येतील. धनगरवाड्यांच्या समस्यांबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे बैठक लावण्यात येईल, असेही वनमंत्री श्री. नाईक यांनी यावेळी सांगितले.
0000
No comments:
Post a Comment