कन्नड तालुका कापूस प्रकिया सहकारी संस्थेची चौकशी करू
- पणन मंत्री जयकुमार रावल
मुंबई, दि. १८ : कन्नड कृषी उत्पन्न बाजार समिती यांनी १९७२ मध्ये चार एकर जमीन कन्नड तालुका कापूस प्रकिया सहकारी संस्थेला दिली होती. या संस्थेने या जागेवर गोडाऊन आणि मशिनरीसाठी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेकडून १० लाख २२ हजार रुपये कर्ज घेतले. हे कर्ज संस्थेने परतफेड केले नसल्याने ही मिळकत विक्री करण्यासंदर्भात जिल्हा बँकेने नोटीस प्रसिद्ध केली होती. या प्रक्रियेत अनियमितता आणि गैरव्यवहार झाले असल्यास या संस्थेची चौकशी केली जाईल, असे पणन मंत्री रावल यांनी विधान परिषदेत सांगितले.
विधान परिषदेतील विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे यांनी यासंदर्भात लक्षवेधी सूचना मांडली होती.
पणन मंत्री श्री.रावल म्हणाले की, कृषी उत्पन्न बाजार समितीने चार एकर जागा कन्नड तालुका कापूस सहकारी संस्थेला भाडेतत्त्वावर दिली होती. पुढील काळात संबंधित संस्था आर्थिक अडचणीत आली आणि जिल्हा बँकेने त्या जमिनीचा लिलाव करण्यासाठी जाहिरात दिली. मार्केट कमिटीने या विरोधात न्यायालयात धाव घेतली. उच्च न्यायालयात झालेल्या तडजोडीनुसार, ८० लाख रुपयांऐवजी २५ लाख रुपयांचा एकरकमी तोडगा काढण्यात आला. त्यानंतर लिलावाद्वारे ४९ लाख रुपये मिळवण्यात आले, त्यातील २५ लाख बँकेला भरले गेले आणि उर्वरित रक्कम संबंधित संस्थेच्या खात्यावर जमा करण्यात आली असल्याचेही पणन मंत्री श्री.रावल यांनी यावेळी सांगितले.
000
No comments:
Post a Comment