शिवडी येथील क्षयरोग रुग्णालयास
सर्व सोयी सुविधा उपलब्ध करुन देणार
- नगरविकास राज्यमंत्री माधुरी मिसाळ
मुंबई, दि. 18 : शिवडी येथील क्षयरोग रुग्णालय हे राज्यातील सर्वात मोठे क्षयरोग रुग्णालय आहे. या रुग्णालयास आवश्यक त्या सर्व सोयी सुविधा पुरवण्यात येतील अशी माहिती नगरविकास राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांनी विधानपरिषदेत दिली.
सदस्य श्रीकांत भारतीय यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नाला उत्तर देताना राज्यमंत्री मिसाळ बोलत होत्या.
शिवडी येथील क्षयरोग रुग्णालयामध्ये सीसीटीव्ही कॅमेरे, रक्षक यांची नेमणूक करण्यात आली असल्याचे सांगून राज्यमंत्री मिसाळ म्हणाल्या की, या रुग्णालयात रुग्णसेवा देण्यासाठी विशेषज्ञ वैद्यकीय सल्लागार, वरिष्ठ वैद्यकीय अधिकारी, वैद्यकीय अधिकारी व शल्यचिकित्सक संवर्गातील 20 पदे कार्यरत आहेत. 33 पदे कंत्राटी तत्वावर भरण्यात आली आहेत. तसेच याठिकाणी मध्यवर्ती संदर्भ प्रयोगशाळा, बाल क्षयरोगकक्ष, अद्ययावत शस्त्रक्रियागार, 10 खाटांचे उरोरोग अतिदक्षता विभाग, फुफ्फुसिय पुनर्वसन केंद्र, 24 तास क्ष किरण सुविधा, क्लिष्ट आजार असलेल्या क्षयरुग्णांसाठी इको इंडिया सारख्या उपक्रमांशी सलग्नता, क्षयरोग बरा झालेल्या परंतु फुफ्फुसे निकामी झालेल्या क्षयरुग्णांसाठीचा कक्ष, डिस्ट्रिक्ट रेसिडेन्सी प्रोग्राम अंतर्गत पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमाच्या डॉक्टरांची नियुक्ती यासारख्या सेवा सुविधा सुरू करण्यात आल्या असल्याची माहितीही राज्यमंत्री मिसाळ यांनी दिली.
0000
No comments:
Post a Comment