दिग्रस नगरपरिषद क्षेत्रातील आरक्षित जागांवरील
अवैध भूखंड खरेदी-विक्री प्रकरणी एसआयटी मार्फत चौकशी करणार
- महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे
मुंबई, दि. १७ : दिग्रस नगरपरिषद क्षेत्रातील रेल्वे आणि विकासयोजनेतील आरक्षित जागेवर अवैध भूखंड विक्री -खरेदी आणि अनधिकृत बांधकाम प्रकरणाच्या सखोल चौकशीसाठी विशेष तपास पथक (एसआयटी) नेमून यासंदर्भात तीन महिन्यात चौकशी पूर्ण करून कारवाई करण्यात येईल.असे महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी विधानसभेत सांगितले.
विधानसभा सदस्य संजय गायकवाड यांनी लक्षवेधी सूचना मांडली होती.
महसूलमंत्री श्री.बावनकुळे म्हणाले की, दिग्रस शहराची सुधारित विकास योजना 2012 मध्ये मंजूर झाली होती. यामध्ये खेळाचे मैदान, दफनभूमीचा विस्तार, बगीचा आणि भाजी बाजार यासारख्या आरक्षणांवर नियमबाह्य पद्धतीने अवैध भूखंड खरेदी-विक्री झाल्याचे निदर्शनास आले आहे यासंदर्भात जिल्हाधिकारी, यांच्या आदेशानुसार यवतमाळचे सहायक संचालक नगर रचना यांच्या अध्यक्षतेखाली एक चौकशी समिती स्थापन करण्यात आली आहे. या समितीकडून सखोल तपास सुरू आहे.
या विषयाचे गांभीर्य लक्षात घेऊन महसूल, नगरविकास आणि गृह विभागाची एकत्रित ‘एसआयटी’ नेमून या प्रकरणाची संपूर्ण चौकशी कालमर्यादेत केली जाईल आणि दोषींवर कठोर कारवाई केली जाईल असेही महसूलमंत्री यांनी सभागृहात सांगितले.
या लक्षवेधीमध्ये सदस्य सुधीर मुनगंटीवार,हरिश पिंपळे यांनी सहभाग घेतला.
No comments:
Post a Comment