भारतीय सिनेमा जागतिक लोकप्रिय संस्कृतीचा भाग
न्यूझीलँडच्या प्रधानमंत्र्याकडून प्रशंसा
मुंबई, दि. १९ : भारतीय सिनेमाच्या समृद्ध इतिहासाचा गौरव करणाऱ्या राष्ट्रीय फिल्म विकास महामंडळ आणि राष्ट्रीय चित्रपट संग्रहालयाला न्यूझीलँडचे प्रधानमंत्री क्रिस्टोफर लक्सन यांनी भेट देऊन भारतीय सिनेमाच्या प्रवासाची माहिती घेतली. या संग्रहालयात १०० वर्षांचा इतिहास एकत्रित करण्यात आला आहे. हा वारसा खरोखरच अद्भुत आहे. भारतीय सिनेमा आता संपूर्ण जगभरात पोहोचत आहे. तो जागतिक लोकप्रिय संस्कृतीचा एक भाग होत आहे, असे प्रशंसोद्गार न्यूझीलँडचे प्रधानमंत्री क्रिस्टोफर लक्सन यांनी काढले.
या भेटीप्रसंगी प्रधानमंत्री क्रिस्टोफर लक्सन यांचे स्वागत एनएफडीसीचे महाव्यवस्थापक डी. रामकृष्णन पुष्पगुच्छ देऊन केले. यावेळी संग्रहालयाच्या पदाधिकारी जयिता घोष, अभिनेता अनंत विजय जोशी व संग्रहालयाचे कर्मचारी उपस्थित होते.
प्रधानमंत्री लक्सन म्हणाले की, भारतीय सिनेमाची सुरुवात मूकपटांपासून झाली, मग बोलपट आले, आणि आता आधुनिक सिनेमा ज्या पद्धतीने पुढे जात आहे, ते पाहणे खूपच विशेष वाटते. त्यामुळे चित्रपट क्षेत्रात काम करणाऱ्या प्रत्येकाला अभिमान वाटायला हवा, कारण या कामामुळे आपण भारताला जगभरात प्रसिद्ध करत आहात. न्यूझीलँडची चित्रपटसृष्टी देखील मोठी असून अनेक भारतीय सिनेमाचे चित्रीकरण न्यूझीलँडमध्ये होत असते. भविष्यातही अशा अनेक संधी मिळाव्यात, अशी अपेक्षाही प्रधानमंत्री लक्सन यावेळी व्यक्त केली.
या संग्रहालयाची उभारणी केल्याबद्दल अभिनंदन करताना चित्रपटांचा इतिहास जपण्यासाठी सर्व चित्रपटांचे डिजिटायझेशन करत असल्याबद्दल त्यांनी सर्व समुहाचे कौतुकही केले. प्रधानमंत्री लक्सन यांनी यावेळी अभिनेता अनंत जोशी यांच्यासोबत प्रसिद्ध हिंदी गीतावर ठेका धरला.
No comments:
Post a Comment