पवित्र पोर्टलच्या माध्यमातून कोणतीही चुकीची भरती नाही
- शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे
मुंबई, दि. ६ : पवित्र पोर्टलच्या माध्यमातून कोणतीही चुकीची भरती झाली नसल्याचे स्पष्टीकरण शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे यांनी विधानपरिषदेत दिले. सदस्य इद्रिस नायकवडी यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नाला उत्तर देताना ते बोलत होते. यावेळी चर्चेमध्ये सदस्य शशिकांत शिंदे, अभिजीत वंजारी यांनी सहभाग घेतला.
पवित्र पोर्टलच्या माध्यमातून गुणवत्तेवर अधारित शिक्षकांची भरती होत असल्याचे सांगून शालेय शिक्षण मंत्री श्री.भुसे म्हणाले की, सर्व माध्यमांच्या शाळांमध्ये भाषा विषय शिकवणाऱ्या शिक्षकांची नेमणूक करताना त्यांचे व्यावसायिक शिक्षण म्हणजेच डीएड, बीएड हे त्याच भाषेत झाले असल्यासच नियुक्ती देण्यात येते. तसेच पवित्र पोर्टल टप्पा दोनमध्ये नियुक्त केलेल्या शिक्षकांचा विद्यार्थ्यांशी चांगला संवाद निर्माण व्हावा यासाठी त्याच माध्यमातून शिक्षण घेतलेल्या उमेदवारांना प्राधान्य देण्याची तरतूद करण्यात येत आहे. यामुळे सर्वच विषयांमध्ये शिक्षण घेताना विद्यार्थी आणि शिक्षक यांच्यामध्ये सुसंवाद प्रस्थापित होऊन दर्जेदार शिक्षण देता येईल. यासाठी उमेदवाराचे इ.10 वीचे माध्यम विचारात घेतले जाणार आहे.
उर्दु आणि कन्नड माध्यमांच्या शाळांमध्ये त्या भाषेत शिक्षण न घेतलेल्या शिक्षकांची नेमणूक झालेली नाही. तर त्या - त्या विषयामध्ये व्यवसायिक शिक्षण घेतलेल्या उमेदवारांचीच नेमणूक करण्यात आली आहे. तसेच विद्यार्थ्यांशी आणखी चांगल्या प्रकारे संवाद साधता यावा यासाठी पवित्र पोर्टल दोनमध्ये उमेदवार नियुक्तीच्या तरतूदी करण्यात येत असल्याचेही श्री. भुसे यांनी सांगितले.
No comments:
Post a Comment