बोखारा ग्रामपंचायतीतील
आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी दोषींवर कारवाई
- ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे
मुंबई, दि. २४ : नागपूर जिल्ह्यातील बोखारा ग्रामपंचायतीच्या कर्मचाऱ्यांनी बनावट पावत्यांचा वापर करून आर्थिक गैरव्यवहार केला आहे. सॉफ्टवेअरचा वापर करून, या ग्रामपंचायतीमध्ये प्रचंड मोठा भ्रष्टाचार केलेला आहे. यामध्ये दोषी असलेल्यावर कारवाई करण्यात येईल, असे ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांनी विधानसभेत लक्षवेधी सूचनेच्या उत्तरात सांगितले.
याबाबत सदस्य समीर मेघे यांनी ही लक्षवेधी सूचना मांडली.
मंत्री गोरे म्हणाले, या अनुषंगाने गट विकास अधिकारी पंचायत समिती नागपूर यांनी तात्काळ बनावट पावती प्रकरणाचे चौकशी करुन चौकशी अहवाल उपमुख्य कार्यकारी अधिकारी यांना सादर केला आहे. पालकमंत्री यांनी या प्रकरणाची दखल घेऊन जिल्हास्तरीय सखोल चौकशी करण्याचे निर्देश दिले आहेत. त्या अनुषंगाने मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद नागपूर यांनी जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी व मुख्य लेखा तथा वित्त अधिकारी जिल्हा परिषद नागपूर यांची द्विस्तरीय चौकशी समिती नेमली. या समितीच्या अहवालानुसार बनावट पावती पुस्तके व कर संकलन संगणक आज्ञावलीत फेरफार करून कर मागणी व वसुलीची नोंद न घेता वार्षिक गोषवाऱ्यात बदल करून अपहार केला असल्याचे सांगण्यात आले आहे. यामध्ये संबंधित अधिकारी व कर्मचारी यांना निलंबित करण्यात येईल असेही मंत्री गोरे यांनी सांगितले.
No comments:
Post a Comment