वेतन टप्पा अनुदानासाठी शासनाची सकारात्मक भूमिका
- शिक्षण मंत्री दादाजी भुसे
मुंबई, दि. १८ : राज्यातील अनुदानासाठी पात्र ठरलेल्या व वेतन अनुदानासाठी प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांना वाढीव टप्पा देण्यासंदर्भात शासन सकारात्मक भूमिका घेईल, असे शिक्षणमंत्री दादाजी भुसे यांनी विधान परिषदेत सांगितले. त्याचबरोबर, टप्पा अनुदानाच्या पात्रतेचे निकष पूर्ण करणाऱ्या शाळांना अनुदान मंजूर करण्याची प्रक्रिया सुरू केली जाईल, असेही त्यांनी सांगितले.
शासन निर्णयान्वये अंशतः अनुदानित शाळांना 20 टक्के वाढीव टप्पा देण्यासंदर्भात विधानपरिषद सदस्य किरण सरनाईक यांनी लक्षवेधी सूचना मांडली होती.
शिक्षण मंत्री श्री.भुसे म्हणाले की, सन २०२४-२५ या शैक्षणिक वर्षासाठी संच मान्यता प्रक्रिया अंतिम टप्प्यात असून, काही तांत्रिक अडचणी दूर करण्यात आल्या असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.
मृत शिक्षक श्री.नागरगोजे यांच्यासंदर्भातील दुर्दैवी घटनेबाबत शालेय शिक्षण मंत्री श्री.भुसे म्हणाले की, श्री.नागरगोजे हे सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या अंतर्गत आश्रमशाळेतील शिक्षक होते. त्यांच्या संदर्भात सरकार सकारात्मक निर्णय घेईल.
टप्पा अनुदानाच्या अंमलबजावणीसाठी सरकार गांभीर्याने विचार करत असून, यावर तोडगा काढण्यासाठी मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांसोबत चर्चा केली जाईल, असेही श्री.भुसे यांनी सांगितले.
या लक्षवेधी सूचनेत विधानपरिषद सदस्य सर्वश्री जगन्नाथ अभ्यंकर, अभिजीत वंजारी, विक्रम काळे, धीरज लिंगाडे, किशोर दराडे यांनी सहभाग नोंदविला.
000
No comments:
Post a Comment