महापालिकेत इलेक्ट्रिकल सेफ्टी ऑडिट यंत्रणा उभारण्यात येणार
- मंत्री उदय सामंत
मुंबई, दि. ७ :- मुंबईमध्ये जुन्या आणि नव्या उंच इमारतींना आग लागण्याच्या घटना घडतात. या बहुतांश घटना शॉर्ट सर्किट, ज्वलनशील पदार्थाचे निष्काळजीपणे हाताळणे, अग्निशामन नियमावलीचे पालन न झाल्यामुळे घडत असल्याचे निदर्शनास आले आहेत. या पार्श्वभूमीवर या सर्व इमारतींचे इलेक्ट्रिकल सेफ्टी ऑडिट करण्यासाठी महापालिकेत इलेक्ट्रिकल सेफ्टी ऑडिट यंत्रणा उभारून ऑडिट करण्यात येणार असल्याचे मंत्री उदय सामंत यांनी विधानसभेत प्रश्नोत्तराच्या तासात सांगितले.
याबाबतचा प्रश्न सदस्य अमित साटम यांनी उपस्थित केला होता. यावेळी सदस्य प्रशांत ठाकूर, अमीन पटेल यांनी उपप्रश्न उपस्थित केला.
मंत्री श्री. सामंत म्हणाले, महाराष्ट्र आग प्रतिबंधक व जीव संरक्षक उपाययोजना अधिनियम, 2023 च्या कलम 45 अ मध्ये लेखापरीक्षण करण्याची तरतूद करण्यात आली असून ज्या इमारती कलम 45 मध्ये दर्शविण्यात आलेल्या आहेत. त्यांच्या मालक, भोगवटादारांनी प्रथम वर्षी लेखापरीक्षण करणे व त्यानंतर प्रत्येक दोन वर्षातून एकदा लेखापरीक्षण करावयाचे आहे. लेखापरीक्षकाच्या नेमणुकीबाबत महाराष्ट्र आग प्रतिबंधक व जीव संरक्षक उपाययोजना नियमात योग्य सुधारणा करण्याची कार्यवाही विभाग स्तरावर सुरू आहे.
यावेळी राज्यमंत्री माधुरी मिसाळ म्हणाल्या, तीस मीटर उंचीपेक्षा अधिक इमारतींना फायर ऑडिट करणे बंधनकारक आहे. याबाबत नगरविकास विभागामार्फत यंत्रणा तयार करण्यात येत आहे. लेखापरीक्षकाची नेमणुक करण्यात येणार आहे.
0000
No comments:
Post a Comment