परिवहन भवनचे 2 मार्चला मुख्यमंत्र्यांच्या हस्ते भूमिपूजन
- परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची माहिती
मुंबई, दि.1 : विभागाचे मुख्यालय असलेल्या " परिवहन भवन " या नव्या इमारतीचे भूमिपूजन 2 मार्च रोजी दुपारी 2 वाजता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याहस्ते होणार आहे. याप्रसंगी उपमुख्यमंत्री अजित पवार व एकनाथ शिंदे हे उपस्थित राहणार असल्याची माहिती परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिली.
रस्ते वाहतुकीची नियमन करण्यासाठी 1 मार्च 1940 ला तत्कालीन मुंबई राज्याचा परिवहन विभाग अस्तित्वात आला. त्यामुळे 1 मार्च हा दिवस "परिवहन दिन" म्हणून साजरा केला जातो. या दिवसाची औचित्य साधून या रविवारी सर पोचखानवाला मार्ग वरळी, मुंबई येथे मुख्यमंत्र्यांहस्ते 4 मजली प्रशस्त अशा "परिवहन भवन" या इमारतीचे भूमिपूजन होत आहे. सुमारे 12,800 चौरस मीटर बांधकाम क्षेत्र असलेल्या या इमारतीमध्ये एकावेळी 150 चारचाकी वाहने उभी करता येतील, इतकी चार मजल्याची भूमिगत पार्किंग व्यवस्था निर्माण करण्यात येणार आहे. ही इमारत पुढील अडीच वर्षांत बांधून पूर्ण केली जाणार आहे.
विशेष म्हणजे राज्याला दरवर्षी 15 हजार कोटी रुपये महसूल मिळवून देणाऱ्या या विभागाच्या मुख्यालयाला स्वतःची इमारत नव्हती. परिवहन विभाग स्थापन झाल्यापासून तब्बल गेली 85 वर्ष या विभागाचे मुख्यालय भाड्याच्या इमारतीमध्ये होते. परिवहन मंत्री म्हणून प्रताप सनाईक यांनी पदभार स्वीकारल्यानंतर परिवहन विभागाच्या पहिल्या बैठकीमध्ये परिवहन विभागाच्या मुख्यालयाची स्वतःची इमारत बांधण्याचा संकल्प सोडला. एवढंच नाही तर त्यांनी सातत्याने पाठपुरावा देखील केला. अखेर त्यांच्या प्रयत्नांना यश येऊन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याहस्ते "परिवहन भवन" या परिवहन विभागाच्या मुख्यालयाचे येत्या रविवारी भुमिपुजन होत आहे.
No comments:
Post a Comment