Tuesday, 4 February 2025

अवैध दारू विरोधी कारवाईत मृत्यू पावलेल्या राज्य उत्पादन शुल्क विभागामधील जवानाच्या वारसांना साडेसात लाख नुकसान भरपाई

 अवैध दारू विरोधी कारवाईत मृत्यू पावलेल्या 

राज्य उत्पादन शुल्क विभागामधील

जवानाच्या वारसांना साडेसात लाख नुकसान भरपाई

- उपमुख्यमंत्री अजित पवार यांची माहिती

राज्य उत्पादन शुल्क विभागाचे यासंदर्भात 

कायमस्वरुपी धोरण तयार करण्याचे निर्देश

 

            मुंबई दि.०४ :- अवैध दारू विरोधी कारवाईत मृत्युमुखी पडलेल्या नाशिक येथील राज्य उत्पादन शुल्क कार्यालयातील जवान तथा वाहन चालक कैलास गेणू कसबे यांच्या कुटुंबीयांना शासनाकडून विशेष बाब म्हणून साडेसात लाख रुपयांची नुकसान भरपाई मंजूर करण्यात आली आहे.तसेच भविष्यात अशा प्रकरणांमध्ये सत्वर मदत होण्याच्या दृष्टीने गृह विभागाच्या धर्तीवर राज्य उत्पादन शुल्क विभागाचे कायमस्वरुपी धोरण तात्काळ करण्याचे निदेशही देण्यात आले आहेत अशी माहितीउपमुख्यमंत्री तथा राज्य उत्पादन शुल्क मंत्री अजित पवार यांनी दिली.

             नाशिक राज्य उत्पादन शुल्क विभाग भरारी पथक क्र.१ मधील अधिकाऱ्यांनी त्यांच्या कार्यक्षेत्रात अवैधपणे मद्यविक्री करणाऱ्या ढाब्यावर ७ जुलै २०२४ रोजी रात्री कारवाई केली होती. अवैध मद्यविक्री करणाऱ्या आरोपींच्या वाहनाचा पाठलाग करीत असताना राज्य उत्पादन शुल्क नाशिक यांच्या भरारी पथकाच्या वाहनाला आरोपींच्या वाहनाने धडक दिली व त्यामध्ये जवान तथा वाहनचालक कैलास गेणू कसबे यांचा मृत्यू झाला होता.

            उपमुख्यमंत्री तथा राज्य उत्पादन शुल्क मंत्री श्री.पवार यांनी या खात्याचा कार्यभार घेताच या प्रकरणात वैयक्तिक लक्ष घातले. त्यांनी केलेल्या पाठपुराव्यामुळे सन २०१४ मध्ये गृह विभागाने केलेल्या मदतीच्या धर्तीवर (पोलीस दलातील कर्मचाऱ्यांना अनुज्ञेय ठरल्याप्रमाणे साडेसात लाख रुपये) राज्य उत्पादन शुल्क विभागातील दिवंगत जवान कैलास कसबे यांच्या वारसांना विशेष बाब म्हणून रु.७.५० लाख नुकसान भरपाई मंजूर केली आहे.

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi