Monday, 10 February 2025

मुंबई भारताची 'कन्व्हेन्शन कॅपिटल' - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ताज समुहाच्या नव्या ताज बॅण्डस्टॅण्ड हॉटेलचे भूमिपूजन



 मुंबई भारताची 'कन्व्हेन्शन कॅपिटल'

- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

ताज समुहाच्या नव्या ताज बॅण्डस्टॅण्ड हॉटेलचे भूमिपूजन

 

मुंबई, दि.10 : मुंबई ही भारताची 'कन्व्हेन्शन कॅपिटलम्हणून उदयास येत आहे. बांद्रा परिसरात ‘ताज’ ग्रुपच्या नव्या आणि अत्याधुनिक हॉटेलमधील आधुनिक कन्व्हेन्शन सेंटरमुळे मुंबईतील व्यावसायिक संधी अधिक वाढतीलअसा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला.

           ‘ताज’ ग्रुपच्या बांद्रा परिसरातील नव्या आणि अत्याधुनिक हॉटेलचे भूमिपूजन मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आले. या प्रसंगी टाटा सन्सचे अध्यक्ष एन. चंद्रशेखरनमाहिती तंत्रज्ञान व सांस्कृतिक कार्यमंत्री अॅड. आशिष शेलारमाजी मंत्री दीपक केसरकर ,इंडियन हॉटेल्सचे सीईओ  पुनीत चटवाल तसेच विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.

मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले कीमुंबईच्या सौंदर्यात भर घालणारे, पर्यटन तसेच व्यावसायिक दृष्टिकोनातून महत्त्वाचे ठरणारे हे हॉटेल भविष्यात मुंबईची  एक नवी ओळख निर्माण करेल. टाटा समूह आणि विशेषतः ताज हॉटेल्सचा भारताच्या विकासात मोठा वाटा आहे. "ताज हे केवळ एक हॉटेल नसूनप्रत्येक भारतीयाचा अभिमान आहे," "20 व्या शतकातील कुलाब्यातील ताजप्रमाणे, 21 व्या शतकातील हे हॉटेल नवे प्रतिक ठरेल," असा विश्वास मुख्यमंत्री फडणवीस यांनी व्यक्त केला. मुंबईत आणखी नव्या आंतरराष्ट्रीय स्तरावरील सुविधा असलेल्या हॉटेल्सची गरज असूनही संधी हेरून या क्षेत्रातील कंपन्यांनी नव्या प्रकल्पांची उभारणी करावीअसे आवाहनही श्री. फडणवीस यांनी केले.

          या संपूर्ण प्रक्रियेत मुंबई महानगरपालिका वेगवान निर्णयात सकारात्मक असेल. अशा प्रकल्पांच्या उभारणीमध्ये कुठलाही अडथळा येणार नाही. प्रशासन ही केवळ नियामक संस्था नसूनविकासातील भागीदार आहे," असे मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले.

या संपूर्ण प्रकल्पामागे टाटा समूहाचे मार्गदर्शकअध्वर्यू दिवंगत रतन टाटा यांचे महत्त्वाचे योगदान असून रतन टाटा यांचे हे स्वप्न या निमित्ताने पूर्ण होईल. या सोहळ्याच्या माध्यमातून मुंबईच्या पर्यटन आणि व्यावसायिक प्रगतीच्या दिशेने एक महत्त्वाचे पाऊल उचलण्यात आले आहेअसा विश्वास व्यक्त करत मुख्यमंत्री फडणवीस यांनी इंडियन हॉटेल्स आणि टाटा समूहाचे अभिनंदन केले.

नागपूरमध्येही अत्याधुनिक सुविधांसह हॉटेल उभारण्याचा टाटा ग्रुपचा विचार असल्याचे यावेळी सांगण्यात आले. याप्रसंगी टाटा सन्सचे अध्यक्ष एन. चंद्रशेखरन यांनी मनोगत व्यक्त केले. तर इंडियन हॉटेल्सचे सीईओ पुनीत चटवाल यांनी प्रास्ताविक केले.

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi