वऱ्हाडी बोलीभाषेचे वैशिष्ट्य
वऱ्हाडी ही मराठीची अत्यंत महत्त्वाची आणि लोकप्रिय बोली आहे. विदर्भात बोलली जाणारी ही बोली आपल्या सहज संवादशैलीमुळे प्रसिद्ध आहे. वऱ्हाडी भाषेचा विनोदी बाज हा तिचा खास गुणधर्म आहे. वऱ्हाडी बोलीत बोलताना एक वेगळीच गंमत असते. शब्दांच्या उच्चारांतील लयबद्धता आणि लहेजा मराठीला एक वेगळेच सौंदर्य प्रदान करतो.
वऱ्हाडी भाषेचे महत्त्व
मराठीला अभिजात भाषेचा दर्जा देताना वऱ्हाडी भाषेतील लिखाण अलिकडच्या काळात विशेष अधोरेखित झाले आहे. लीळाचरित्र या महानुभव पंथाच्या ग्रंथात वऱ्हाडीचा प्रभाव आढळतो. आद्य मराठी कवी मुकुंदराज यांच्या लेखनातही वऱ्हाडीचा वापर दिसतो. संत तुकडोजी महाराजांनी ग्रामगीता ग्रंथात वऱ्हाडीचा प्रभावी वापर केला आहे. कर्मयोगी गाडगेबाबांचे प्रवचनदेखील अस्सल वऱ्हाडी भाषेत असायचे. पुरुषोत्तम बोरकर यांची मेड इन इंडिया, उद्धव शेळके यांची धग कादंबरी त्यातील वऱ्हाडी भाषा यांनी अनेक पिढ्यांना वेड लावले आहे. अनेक अशा अशा कादंबऱ्या, कथा मान्यवर लेखकांनी मराठी वाचकांना दिल्या आहेत.
वऱ्हाडीतील साहित्यिक योगदान
वऱ्हाडी भाषेत विपुल प्रमाणात साहित्यनिर्मिती झाली आहे. कथा, कादंबऱ्या, कविता, आत्मचरित्र, नाटके, सिनेमा अशा विविध माध्यमांद्वारे ही भाषा आपल्या भाषिक परंपरेत एक ठसा उमटवत आहे. अनेक लेखक आणि साहित्यिकांनी वऱ्हाडी भाषेत उत्कृष्ट लेखन केले आहे. वेगवेगळ्या टीव्ही सिरीयल,कॉमेडी शो आणि चित्रपटात या बोली भाषेचा वापर मोठ्या प्रमाणात होतो. हिंदी भाषेनंतर हास्य कवी संमेलनाची संस्कृती वऱ्हाडी भाषेने सर्वाधिक जोपासली आहे. माध्यमांमुळे या बोलीभाषा आता आपल्या सीमा भेदून सार्वत्रिक होत आहे.
प्रा. देविदास सोटे, पुरुषोत्तम बोरकर, उद्धव शेळके, मनोहर तल्हार, बाजीराव पाटील, गो. नी. दांडेकर, महेश दारव्हेकर, पांडुरंग गोरे, विठ्ठल वाघ, डॉ. मिर्झा रफी अहमद बेग,शंकर बडे, मधुकर केचे, ज्ञानेश वाकुडकर,शाम पेठकर, नाना ढाकूलकर, मनोहर कवीश्वर, मधुकर वाकोडे, गौतम गुडदे, डॉ. प्रतिमा इंगोले, शरदचंद्र सिन्हा, जगन वंजारी, राजा धर्माधिकारी, बापुराव झटाले, अॅड. अनंत खेळकर, किशोर बळी, रमेश ठाकरे, बापुराव मुसळे, रावसाहेब काळे,सदानंद देशमुख, नरेंद्र लाजेवार, नरेंद्र इंगळे,आदी मान्यवरांसह शेकडो लेखकांनी वऱ्हाडी भाषेतील साहित्य समृद्ध केले आहे.
वऱ्हाडी भाषेतील नाटक आणि गझलसुद्धा विशेष प्रसिद्ध आहेत. कविवर्य सुरेश भट यांनी मराठीत गझल लेखन केले, पण खासगी संभाषणात ते अस्सल वऱ्हाडीच वापरत. वऱ्हाडी भाषेतील सहज संवाद साधण्याची शैली, विनोदी प्रकृती, आणि लयदार उच्चार हा एक वेगळाच अनुभव देतात.
विदर्भाच्या 11 जिल्ह्यांमध्ये, मराठवाड्याच्या सीमावरती भागात, तसेच मध्य प्रदेशातील तेलंगाना व आंध्र प्रदेशातील अनेक भागांमध्ये वेगवेगळ्या पद्धतीने वऱ्हाडी भाषा बोलली जाते. अमरावती, यवतमाळ या जिल्ह्यांमध्ये वेगळ्या पद्धतीने तर अकोला, वाशिम, बुलढाणा या जिल्ह्यामध्ये त्यामध्ये थोडा बदल होऊन भाषा बोलली जाते. नागपूर शहरातील बोलली जाणारी भाषा ही देखील एक वेगळी वऱ्हाडी शैली आहे. नागपूर मेट्रोने तर खास नागपुरी शब्दांच्या जाहिराती केल्या आहेत. विशेष म्हणजे त्या त्या भागातील नागरिक एकमेकांना भेटल्यानंतर या शब्दांचा भरपूर वापर करतात. भाषिक जवळीकता साधण्यासाठी हे शब्द ओळखीचे काम करते. पुढे हीच भाषा भंडारा, गोंदिया, गडचिरोली या भागामध्ये वेगळा हेल घेते. तिचे उच्चार वेगळ्या पद्धतीने केले जाते. मात्र हजारोंनी या भाषेचे संवर्धन केले आहे. मराठी भाषेच्या समृद्धीचा विचार करताना मोठ्या संख्येने बोलल्या जाणाऱ्या बोलीभाषा, त्यांचे संवर्धन आणि त्याचा अभ्यास करण्याचे व्यासपीठ अशी मोठी संमेलन असतात. दिल्लीच्या व्यासपीठावर अभिजात भाषेचा गुणगौरव होताना बोलीभाषेच्या सुप्त प्रवाहावरही चर्चा करावी लागणार आहे. बोलीचे वैभव,भाषेची संपन्नता वाढवणारे आहे.
No comments:
Post a Comment