मराठीची अस्मिता आणि बोलीभाषांचे स्थान
पु. ल. देशपांडे यांना वऱ्हाडी भाषेच्या विनोदी बाजाचे फार आकर्षण होते. सुरेश भट लतादीदी ,आशा भोसले आणि मंगेशकर घराण्यातील व्यक्तीशी वऱ्हाडी भाषेतून संवाद साधायचे. त्यांच्या वऱ्हाडी संवादाचे मैफिलीमध्ये खास आकर्षण असायचे. खरे तर भाषा केवळ संवादाचे साधन नसून ती तिच्या संस्कृतीचा, अस्मितेचा अभिव्यक्त होण्याचा मार्ग असते. उर्दूची अदब, गुजरातीची गोडी, आणि वऱ्हाडीची मिश्किलता, विनोदी शैली हे वैशीष्टय आहे.
म्हणूनच बोलीभाषांचे अस्तित्व टिकवणे आणि त्यांना जपणे हे मराठी भाषेच्या समृद्धीसाठी आवश्यक आहे. महाराष्ट्रात बोलीभाषांनी जो भाषिक गोतावळा तयार केला आहे, त्याने मराठीला अधिक समृद्ध केले आहे. मराठीने आपल्या अंगाखांद्यावर या उपभाषांना वाढवले, संगोपन केले आणि त्यांना भाषिक अस्मिता बहाल केली.
आजच्या काळातही बोलीभाषांचे संवर्धन हे मराठीच्या भविष्यासाठी महत्त्वाचे आहे. कारण मातृभाषा ही आपल्या संस्कृतीची ओळख असते. आई जी भाषा बोलते तीच मुलाची भाषा होते आणि तीच त्याच्या जीवनाचा अविभाज्य भाग बनते.
मराठी भाषा ही केवळ एक संवादमाध्यम नसून एक संस्कृती आहे. बोलीभाषा ही तिच्या समृद्धीचा गाभा आहेत. वऱ्हाडी, अहिराणी, कोकणी, कोल्हापुरी यासारख्या अनेक उपभाषांनी मराठीच्या प्रवाहाला अधिक खोल आणि विस्तारलेले स्वरूप दिले आहे.
आजही मराठी भाषेच्या जडणघडणीत या बोलीभाषांचा मोलाचा वाटा आहे. बोलीभाषांचे संवर्धन आणि त्यांचे लेखन-साहित्यिक योगदान पुढे नेणे, हे मराठी भाषेच्या उज्ज्वल भविष्यासाठी आवश्यक आहे. त्यामुळे मराठी भाषा ही केवळ बोलीभाषांच्या आधाराने अधिकाधिक समृद्ध होत राहील. नवी दिल्ली येथे होणाऱ्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनामध्ये मायमराठीच्या या उपभाषांच्या संवर्धनासंदर्भातही वैचारिक मंथन अपेक्षित आहे.मराठी भाषा ही समुद्र आहेत तर तिच्यात मिसळणाऱ्या बोलीभाषा या विविध नदयांप्रमाणे आपले भाषिक सौंदर्य तिच्यामध्ये कायम मिसळत राहते. हा ओघ असाच कायम असणे खूप गरजेचे आहे. शब्दांचे वैशिष्ट्य, शब्दांचा गोडवा, शब्दांचे अर्थ, त्याची आशयघनता, काळाच्या गतीमध्ये लुप्त होऊ नये. थोडक्यात वऱ्हाडी शब्दांचा वापर करून सांगायचे झाल्यास असा 'बैताडपणा, छपरीपणा, इचकपणा, नंबरीपणा, उपटपणा, घरावर गोटे आणण्याचे धंदे अन् ' जांगडबुत्ता ' मराठी भाषेवर चिंतन करताना होऊ नये ,एवढीच अपेक्षा आहे.
No comments:
Post a Comment