नानाजी देशमुख कृषि संजीवनी प्रकल्पातील
कामे पारदर्शकपणे करावी
- कृषीमंत्री ॲड. माणिकराव कोकाटे
मुंबई, दि. 4 : नानाजी देशमुख कृषि संजीवनी प्रकल्पाचा दुसरा टप्पा राज्यात राबवताना, राज्यात 21 जिल्ह्यातील 7201 गावातील कामांममध्ये पारदर्शकता असावी, शेतीमध्ये आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करणे,पाण्याचा कार्यक्षम वापर करणे, जमिनीचे आरोग्य सुधारण्यासाठी संवर्धित शेती पध्दतीद्वारे कृषी पूरक उद्योगांना चालना देण्यावर भर द्यावा असे निर्देश कृषीमंत्री ॲड. माणिकराव कोकाटे यांनी दिले.
मंत्रालयात नानाजी देशमुख कृषि संजीवनी प्रकल्पासंदर्भात आयोजित बैठकीत कृषीमंत्री ॲड माणिकराव कोकाटे बोलत होते यावेळी कृषी विभागाचे प्रधान सचिव विकासचंद्र रस्तोगी, नानाजी देशमुख कृषि संजीवनी प्रकल्पाचे प्रकल्प संचालक परिमल सिंग, उपसंचालक संतोष अमदापुरे, कृषि विद्यावेत्ता विनय कोळेकर यासह अन्य अधिकारी यावेळी उपस्थित होते.
कृषीमंत्री ॲड. कोकाटे म्हणाले की, नानाजी देशमुख कृषि संजीवनी प्रकल्प टप्पा एक मधील कामे पूर्ण झाली आहेत तर दुस-या टप्प्यातील होणारी कामेही शेतकऱ्यांना विश्वासात घेवून शासनाच्या मार्गदर्शक सूचनांप्रमाणे करावीत. कृषी उत्पादन पध्दतींची कार्यक्षमता वाढविणे,नाविन्यपूर्ण उपक्रमांमध्ये विविध संशोधन संस्थाशी समन्वय व सामंजस्य करार करणे, शेतीमध्ये डिजिटल तंत्रज्ञानाचा वापर, क्षमता बांधणी, मनुष्यबळ व्यवस्थापन, सनियंत्रण व मूल्यमापन यावर भर देण्यात यावा. प्रकल्पातील गाव निवडीचे निकष,शेतीशाळा हा उपक्रम राज्यभरात वाढवून शेतकऱ्यांना योग्य ती माहिती देण्यात यावी.
नानाजी देशमुख कृषि संजीवनी प्रकल्पाचे प्रकल्प संचालक परिमल सिंग यांनी प्रकल्पाची सद्यस्थिती आणि सुरू असलेल्या कामांच्या माहितीचे यावेळी सादरीकरण केले.
No comments:
Post a Comment