सभागृहाच्या माध्यमातून लोककल्याणासाठी योगदान देण्याचा मानस
- विधानपरिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे
सभापतीपदी निवडीबद्दल विधानपरिषदेत प्रा. राम शिंदे यांचे अभिनंदन
नागपूर, दि. 19 : विधीमंडळाचे वरिष्ठ सभागृह म्हणून विधानपरिषदेला वेगळी परंपरा आहे. या वरिष्ठ सभागृहाच्या माध्यमातून लोककल्याणासाठी योगदान देण्याचा मानस आहे. सभागृह कामकाजाचा प्रत्येक क्षण आणि क्षण लोकहितासाठी खर्ची पडेल असे जबाबदारीपूर्ण वर्तन आपले राहिल, अशी काळजी घेऊया, अशा शब्दांत विधानपरिषदेचे नवनियुक्त सभापती प्रा. राम शिंदे यांनी भावना व्यक्त केल्या.
विधानपरिषद सदस्य प्रा. राम शिंदे यांची विधानपरिषदेच्या सभापतीपदी एकमताने निवड झाल्यानंतर अभिनंदनपर प्रस्तावावर प्रा. शिंदे बोलत होते. यावेळी सभागृहात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, सभागृह नेते तथा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, मंत्री पंकजा मुंडे, सदस्य सर्वश्री प्रवीण दरेकर, अशोक ऊर्फ भाई जगताप, शशिकांत शिंदे, ॲड. अनिल परब यांनी निवडीवर भावना व्यक्त केल्या.
सभापती प्रा. शिंदे म्हणाले की, जनतेच्या अपेक्षांना मूर्त स्वरूप देण्यासाठी सभागृह कामकाजाचा प्रत्येक क्षण आणि क्षण उपयोगात आणायचा आहे. सत्ताधारी आणि विरोधी ही संसदीय लोकशाहीच्या रथाची दोन चाके आहेत आणि त्या रथात जनताजनार्दनाची अभिव्यक्ती विराजमान आहे. या रथाला विकासाच्या दिशेने नेवू. सदस्यांचा सभागृह कामकाजातील सहभाग अत्यंत महत्त्वाचा आहे. सभागृहात बसलेले असताना समाजाचा कुठला प्रश्न नेमक्या आयुधामार्फत मांडून आपण जनतेला न्याय देऊ शकू यादृष्टीने सतत तयारी केली पाहिजे. आपले सभागृह ज्येष्ठांचे सभागृह किंवा वरिष्ठ सभागृह म्हणून ओळखले जाते मात्र अलिकडच्या काळात तरूण सदस्यांची वाढती संख्या लक्षात घेता ते वयोमानपरत्वे तरूण होत चालले आहे, असेही त्यांनी यावेळी सांगितले.
विधीमंडळाचे कामकाज प्रभावी होण्यासाठी चतु:सूत्रीचा कार्यक्रम अंमलात आणणार आहे. यामध्ये प्रश्नोत्तराचा तास महत्त्वाचा असून हा तास विनाव्यत्यय पार पडावा. समित्यांचे गठन, समिती प्रमुखांना उचित मार्गदर्शन, सभागृहाला अहवाल सादर होणे ही कार्यपध्दती आणखी गतिमान आणि मजबूत करण्यात येईल.कायदा निर्मिती प्रक्रियेत सदस्यांचा सक्रिय सहभाग असावा. तसेच अर्थसंकल्पावरील सर्वसाधारण चर्चा आणि मागण्यांवरील चर्चा यांना पुरेसा अवधी मिळणे, सदस्यांना आपल्या मतदारसंघाच्या सर्वांगिण विकासासाठी मार्गदर्शन आणि निधी मिळणे यादृष्टीने आपण उत्तम कार्य करणे या चतु:सूत्रीचा अवलंब कामकाजात करणार आहे, असे प्रा. शिंदे यांनी यावेळी सांगितले.
No comments:
Post a Comment