निवडणूक प्रक्रियेत आयोगाच्या मार्गदर्शक सूचनांचे पालन करा
निवडणूक निरीक्षक गोपाल चंद , निवडणूक कामकाजाचा घेतला आढावा
धाराशिव दि.३० (माध्यम कक्ष) : येत्या २० नोव्हेंबर रोजी विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीसाठी मतदान होणार आहे. जिल्ह्यातील चारही विधानसभा मतदारसंघासाठी होणाऱ्या निवडणुकीची जबाबदारी जिल्हा निवडणूक अधिकारी यांच्या मार्गदर्शनात विविध यंत्रणांच्या अधिकारी-कर्मचाऱ्यांवर सोपविण्यात आली आहे.निवडणूक प्रक्रियेच्या कामात कोणतीही चुक होणार नाही यासाठी भारत निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शक सूचनांचे तंतोतंत पालन करावे.असे निर्देश निवडणूक निरीक्षक (सामान्य) गोपाल चंद यांनी दिले.
२९ ऑक्टोबर रोजी जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात विधानसभा निवडणूक कामकाजाचा आढावा घेतांना श्री.चंद बोलत होते.यावेळी निवडणूक निरीक्षक ( सामान्य) श्री.पंकज कुमार, जिल्हाधिकारी डॉ.सचिन ओंबासे, निवडणूक निरीक्षक (खर्च) अलुरु व्यंकट राव निवडणूक निरीक्षक (पोलीस) आर एस.बेलवंशी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.मैनाक घोष, पोलीस अधीक्षक संजय जाधव, उपजिल्हा निवडणूक अधिकारी उदयसिंह भोसले व अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी विलास जाधव यांची प्रमुख उपस्थिती होती.
श्री पंकज कुमार म्हणाले,उमेदवारांच्या नामांकन अर्जाची छाननी आयोगाच्या मार्गदर्शक सूचनेनुसार करावी. छाननी करताना ती अतिशय काळजीपूर्वक आणि दक्षतेनी करावी. छाननीच्या वेळी आवश्यक तेवढा पोलीस कर्मचारी वर्ग उपस्थित ठेवावा, असे त्यांनी सांगितले.
डॉ.श्री.ओंबासे यांनी निवडणुकीच्या दृष्टीने करण्यात येत असलेल्या कामकाजाची माहिती दिली.स्थिर पथके व फिरती पथके आवश्यक त्या ठिकाणी उपलब्ध राहणार आहे.आंतरराज्य व जिल्ह्याच्या सीमेवर पुरेसा पोलीस व निवडणुक यंत्रणाचा कर्मचारी वर्ग २४ तास तपासणी नाक्यावर उपस्थित राहणार आहे. बॅरिकेट्स व सीसीटीव्हीची व्यवस्था करण्यात आली असून अधिकारी व कर्मचारी प्रत्येक वाहनाची तपासणी करून रोख रक्कम, मद्य वाहतूक होत आहे का तसेच संशयास्पद बाबीवर लक्ष ठेवणार असल्याचे त्यांनी सांगितले.
जिल्ह्यातील मतदार संघातील मतदान केंद्र, मतदार, क्रिटिकल मतदान केंद्र, मतदान प्रक्रियेसाठी लागणारे मनुष्यबळ, क्षेत्रीय वाहतूक नियोजन याबाबतची माहिती डॉ.ओंबासे यांनी दिली.
निवडणूक निरीक्षकांनी निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांना आवश्यकता त्या सूचना दिल्या व निवडणुकीच्या तयारीची माहिती त्यांच्याकडून जाणून घेतली. राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधीक्षक श्री.बारगजे यांनी निवडणुकीच्या पार्श्वभूमी जिल्ह्यातील विविध ठिकाणी धाडी टाकून हातभट्टीच्या दारुसह मुद्देमाल जप्त केल्याची माहिती यावेळी दिली. या बैठकीला सर्व नोडल अधिकारी, केंद्रीय वस्तू व सेवा कर विभागाचे अधीक्षक ए.एम.पिललेवार, राज्य वस्तू व सेवा कर विभागाचे सहायक आयुक्त एन.व्ही.शिंदे, आयकर अधिकारी संजय पानसरे व डाक विभागाचे अधीक्षक श्री.अंबेकर उपस्थित होते.
No comments:
Post a Comment