महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या ‘इको बाप्पा मोबाईल ॲप’चे
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते लोकार्पण
मुंबई, दि. १४ : महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ व पर्यावरण व वातावरणीय बदल विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने पर्यावरणपूरक गणेशोत्सवातील विविध जनजागृती उपक्रमांचा आरंभ मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते सह्याद्री राज्य अतिथीगृह येथे झाला.
पर्यावरणपूरक गणेशमूर्तींची, सजावटीची व आभूषणांची वाढती मागणी लक्षात घेऊन महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ व पर्यावरण व वातावरणीय बदल विभाग यांनी इको बाप्पा हे मोबाईल ॲप विकसित केले असून याचे लोकार्पण मुख्यमंत्री श्री. शिंदे, उपमुख्यमंत्री श्री. पवार यांच्या हस्ते झाले. या मोबाईल ॲपच्या माध्यमातून सर्वसामान्य नागरिकांना पर्यावरणपूरक मूर्ती तयार करणाऱ्या कारखानदारांची ठिकाणे उपलब्ध होणार असून यामुळे पर्यावरणपूरक मूर्ती नागरिकांना खरेदी करणे सहज शक्य होणार आहे. ‘इको बाप्पा’ हा ॲप मोबाईल प्लेस्टोर मधून विनामूल्य डाऊनलोड करता येणार असून यामध्ये पर्यावरणपूरक गणेशमूर्तींची खरेदी, आभूषणे, सजावटीचे साहित्य व विसर्जनासाठी कृत्रिम तलावांची माहिती उपलब्ध होणार आहे.
मंडळाने या वर्षीच्या पर्यावरणपूरक उत्सवाला चालना देण्यासाठी शहाणपण देगा देवा या संकल्पनेतून रेडिओ जिंगल्स्, व्हिडिओज् तयार केले असून एक लहान बालक पर्यावरणपूरक उत्सव साजरा करण्याचा अभिनव संदेश यात देत आहे. याचा देखील आरंभ मुख्यमंत्री यांच्या हस्ते करण्यात आला.
या कार्यक्रमाला शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अध्यक्ष सिद्धेश कदम, पर्यावरण व वातावरणीय बदल विभागाचे प्रधान सचिव प्रविण दराडे, म.प्र.नि.मंडळाचे सदस्य सचिव डॉ.अविनाश ढाकणे हे उपस्थित होते तर विभागीय आयुक्त, महानगरपालिका आयुक्त जिल्हाधिकारी दूरदृश्य संवाद प्रणालीद्वारे उपस्थित होते. या वेळी मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी व्हिडिओ कॉन्फर्सिंगच्या माध्यमातून राज्यातील महानगरपालिका, नगरपालिका यांच्या आयुक्त व मुख्याधिकारी यांच्याशी संवाद साधून पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करण्यासाठी व्यापक जनाजगृती व उपाययोजना करण्याचे निर्देश दिले.
सह्याद्री अतिथीगृह येथे आयोजित बैठकीला सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचे राज्यातील प्रमुख पदाधिकारी व सामाजिक संस्थांचे प्रतिनिधी उपस्थित होते.
No comments:
Post a Comment