नागरिकांना सेवांची हमी देणारा पथदर्शी प्रकल्प राज्यातील इतर जिल्ह्यातही राबविण्यात येणार
कोल्हापूर जिल्ह्यात महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम 2015च्या पथदर्शी प्रकल्पाचा शुभारंभ
कोल्हापूर दि. 15 : शासनाच्या विविध सेवा नागरिकांपर्यंत पोहोचवण्याचे काम महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम 2015 अंतर्गत तयार केलेल्या पथदर्शी प्रकल्पाव्दारे निश्चितच होईल. या पथदर्शी प्रकल्पाचे अनुकरण करुन राज्यातील इतर जिल्ह्यातही हा प्रकल्प राबविण्यात येईल असे प्रतिपादन राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले.
महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम 2015 च्या प्रभावी अंमलबजावणीसाठी कोल्हापूर जिल्ह्यात सुरू होत असलेल्या पथदर्शी प्रकल्पाचा शुभारंभ मुख्यमंत्री श्री. शिंदे यांच्या हस्ते दूरदृश्य प्रणालीव्दारे गुरुवारी झाला. या कार्यक्रमासाठी कोल्हापूर येथे वैद्यकीय शिक्षण व विशेष सहाय्य मंत्री तथा कोल्हापुरचे पालकमंत्री हसन मुश्रीफ, राज्य उत्पादन शुल्क मंत्री शंभूराज देसाई, महाराष्ट्र कृषी शिक्षण व संशोधन परिषद, पुणे उपाध्यक्ष तथा आमदार प्रकाश आबिटकर, राज्य लोकसेवा हक्क आयोग पुणे विभागाचे आयुक्त दिलीप शिंदे, जिल्हाधिकारी अमोल येडगे, महानगरपालिका आयुक्त के. मंजुलक्ष्मी, पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित, मुख्य कार्यकारी अधिकारी कार्तिकेयन एस. उपस्थित होते. तसेच दूरदृश्य प्रणालीव्दारे राज्य लोकसेवा हक्क आयोगाचे मुख्य आयुक्त मनुकुमार श्रीवास्तव, मुख्य सचिव सुजाता सौनिक, पुणे विभागीय आयुक्त चंद्रकांत पुलकुंडवार यांचे सह राज्यातील इतर सर्व विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी उपस्थित होते.
यावेळी मुख्यमंत्री श्री. शिंदे म्हणाले, देशाच्या 78 व्या स्वातंत्र्य दिनाच्या मंगलदिनी आपण राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या जन्मभूमीतून महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम 2015 च्या प्रभावी अंमलबजावणीसाठी पथदर्शी प्रकल्पाची सुरुवात करत आहोत. हा अधिनियम 2015 मध्ये सुरू झाला असून, या अंतर्गत शासनाच्या हजारो योजनांचा समावेश करून नागरिकांना तात्काळ व सुलभ सेवा देण्याचे पर्याय उपलब्ध करुन दिले आहेत. तथापि, या कायद्याची अजूनही लोकांना तितकीशी माहिती नाही. सेवांचा प्रभावी वापर होवून कायदा लोकांपर्यंत पोहचला पाहिजे, असे मत त्यांनी व्यक्त केले. पथदर्शी प्रकल्प कोल्हापूर जिल्ह्यात सुरु केल्याबद्दल जिल्हा प्रशासनाचे त्यांनी अभिनंदन केले. या प्रकल्पाच्या मंजुरीसाठी सातत्याने प्रयत्न करणारे आमदार प्रकाश आबिटकर तसेच पालकमंत्री हसन मुश्रीफ व राज्य उत्पादक शुल्क मंत्री शंभूराज देसाई यांचेही त्यांनी अभिनंदन केले.
जिल्ह्यातील प्रत्येक नागरिकांपर्यत सेवा हमी कायदा पोहोचवण्यासाठी जिल्हा प्रशासनाने स्वीकारलेली जबाबदारी कौतुकास्पद असून आता शासनाच्या विविध सेवा नागरिकांच्या घरोघरी वेळेत जातील. जिल्हा प्रशासनाने सुरु केलेल्या घरपोच सेवा, सेवा वाहिनी, आपले सरकार वेब पोर्टल आरटीएस मोबाईल ॲप्लिकेशन, व्हाट्सॲप चॅटबॉट, प्रत्येक तालुक्यात एक आदर्श आपले सरकार सेवा केंद्र तसेच लोकांच्या तक्रारीसाठी सुरु केलेली क्युआर कोड संकल्पना, कार्यालयांचं मानांकन करुन प्रशासन गतीमान करण्याचे नियोजन या सुविधा कौतुकास्पद असल्याचेही मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी सांगितले.
यावेळी मुख्यमंत्री श्री. शिंदे यांच्या हस्ते या प्रकल्पाविषयक माहिती देणाऱ्या चित्रफितीचे अनावरण करण्यात आले, तसेच उपस्थित मान्यवरांच्या हस्ते विविध प्रचार प्रसार पुस्तिकेचेही प्रकाशन करण्यात आले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानावरून बोलताना वैद्यकीय शिक्षण व विशेष सहाय्य मंत्री तथा कोल्हापुरचे पालकमंत्री श्री. मुश्रीफ यांनी या कायद्याच्या यशस्वी अंमलबजावणीसाठी कोल्हापुरची निवड केल्याबद्दल शासनाचे आभार मानले.
अस्तित्वात असणाऱ्या कायद्याच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी चांगले नियोजन केल्याचे मंत्री शंभूराज देसाई यांनी सांगितले. ते म्हणाले, विधानसभेच्या अधिवेशनात स्थानिक आमदार श्री. आबिटकर यांनी महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम 2015 च्या यशस्वी अंमलबजावणीसाठी लक्षवेधी उपस्थित केली. त्यानंतर तसेच हा पायलट प्रकल्प कोल्हापूर जिल्ह्यातून सुरू करण्याचे ठरविले.
कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी सेवा हमी कायदा व पथदर्शी प्रकल्प काय आहे, हे सांगितले तर आभार उपविभागीय अधिकारी हरीश धार्मिक यांनी मानले. कार्यक्रमासाठी जिल्ह्यातील सर्व विभाग प्रमुख, निवडलेल्या शाळा, महाविद्यालयांचे शिक्षक, सरपंच व महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.
विविध प्रचार प्रसार पुस्तिकेचेही प्रकाशन करण्यात आले.
No comments:
Post a Comment