Sunday, 18 August 2024

 19 ऑगस्ट जागतिक छायाचित्र दिनानिमित्त....

परळीतील एका महिला छायाचित्रकाराचा
फोटोग्राफी क्षेत्रातील प्रवासावरील लेख.....
----------------------------------------
फोटोग्राफी क्षेत्राला लाभली नव "संजीवनी"
--------------------------------------------------------  
 छायाचित्र म्हणजे फोटो ही केवळ एक निर्जीव वस्तू नसते, तर ती असते त्या व्यक्तीच्या जीवनातील एक अमूल्य आठवण, छायाचित्रकाराने आपल्या कॅमेऱ्यात बंदिस्त केलेली.
 आपले, आपल्या कुटुंबातील व्यक्तींचे फोटो पाहताना आठवणींचा खजिनाच आपण उघडत असतो. हा खजिना ज्याच्यामुळे जतन करता आला, त्या छायाचित्रकारास मात्र आपण विसरून जातो. या छायाचित्रकारांचे ऋण व्यक्त करण्यासाठी आणि छायाचित्रणास उतेजन देण्यासाठी जगभरात 19 ऑगस्ट हा "जागतिक छायाचित्रण दिन" म्हणून साजरा केला जातो. यावर्षीच्या जागतिक छायाचित्रण दिनाच्या निमित्ताने आपल्या परळीतील एका अनोख्या छायाचित्रकाराचा परिचय करून देण्याचा हा एक छोटासा प्रयत्न. फोटोग्राफी हा पुरुषांची मक्तेदारी असलेला प्रांत.  या पुरुषांच्या दुनियेत नवीन कल्पना सोबत घेऊन अत्यंत दमदारपणे आपले स्वतंत्र स्थान निर्माण करणारी आणि मरगळलेल्या फोटोग्राफी क्षेत्राला नवीन "संजीवनी" देणारी एक उत्कृष्ट फोटोग्राफर म्हणजे सौ संजीवनी राम भाले "बेबी मॅजिक" या आपल्या नवजात बाळांच्या फोटोसाठीच वाहिलेल्या फोटो स्टुडिओच्या माध्यमातून आपल्या फोटोग्राफर पतीला समर्थ साथ देत असलेली एक अतिशय चांगली छायाचित्रकार. मोबाईल कॅमेरा मधील क्रांती नंतर ग्राहकांनी फोटो काढण्यासाठी स्टुडिओत  जाणे जवळजवळ सोडून दिले आहे. प्रत्येक जण आपले फोटो आपल्या मोबाईल कॅमेऱ्यात स्वतःच क्लिक करून हे फोटो सोशल मीडिया द्वारे सार्वजनिक करण्यात आणि आपली कलाकारी दाखवण्यात व्यस्त आहे. हे फोटो जतन करण्यासाठी गुगलने गुगल फोटो फुकटात उपलब्ध करून दिले आहे,त्यामुळे फोटो काढणे हा पूर्वी जसा सोहळा असायचा, तसा तो आता राहिलेला नाही. आपल्या दररोजच्या आठवणी आपण अत्यंत सहजपणे मोबाईल कॅमेऱ्याने टिपून त्या पाहिजे तेवढ्या प्रमाणात जतन करून ठेवू शकतो. फोटोग्राफी क्षेत्राला या नवीन बदलांमुळे मरगळ आल्यासारखी वाटत होती. परळीतील उत्कृष्ट फोटोग्राफर असा नावलौकिक असलेले श्रीराम भाले आपल्या भाले फोटोग्राफी या स्टुडिओच्या माध्यमातून परळीकरांना फोटोग्राफीची सेवा देत असताना, त्यांची पत्नी आपल्या आदिती आणि व्यंकटेश या  चिमुकल्यांना सांभाळत आपले आदर्श गृहिणीचे कार्य पार पाडत होती; याचवेळी फोटोग्राफीची आपल्या मनातील आवड ओळखून आणि या क्षेत्रातील बदलांना सामोरे जाण्यासाठी आपल्या पतीशी चर्चा करून फक्त नवजात बालक आणि चिमुकल्यांच्या भावविभोर करणाऱ्या अदा कॅमेऱ्यात बंदिस्त करण्यासाठी "बेबी मॅजिक" या स्वतंत्र स्टुडिओच्या माध्यमातून परळीकरांना सेवा देण्यास सज्ज झाली, आणि आज या क्षेत्रात स्वतःचे एक स्वतंत्र स्थान या आदर्श गृहिणीने निर्माण केले आहे, ही परळीकरांसाठी अभिमानाची बाब आहे. खरे म्हणजे महिलांना स्वतः नटून थटून, स्वतःचेच फोटो काढण्याची हौस असते, त्यासाठी त्या पाहिजे तेवढा वेळ द्यायला तयार असतात. स्वभावतःच  सर्व स्त्रियांमध्ये एक कलाकार दडलेला असतो. रंगसंगती बद्दलचे त्यांचे ज्ञान तर प्रत्येक पुरुष मान्य करतो. आपले हे उपजत गुण ओळखून आणि प्रकाश योजना, बॅकग्राऊंड, फोटोचा ठराविक अँगल या फोटोग्राफी मधील बारकाव्यांचा अभ्यास करून स्वतःचे फोटो न काढता इतर स्त्रियांना आणि बालकांना सजवून त्यांचे अप्रतिम फोटो काढण्याचे कसब संजीवनी भाले यांनी प्राप्त केले आहे. लहान बालकांचे मुड्स सांभाळून, त्यांची योग्य वेशभूषा करून अगदी सहजपणे त्यांचे आईच्या नजरेतून विविध क्षणांचे फोटो त्या टिपतात. यामधील त्यांचे कौशल्य वाखाणण्याजोगे आहे. नुकत्याच जन्मलेल्या बाळापासून ते केवळ एक महिना वयाच्या बाळाचेच फोटोशूट त्या करतात. आपल्या या स्वतंत्र स्टुडिओच्या माध्यमातून नवजात बाळांच्या पालकांसाठी, आपल्या बाळाचे लहानपण कॅमेऱ्यात बंदिस्त करण्याचा त्यांचा हा "बेबी मॅजिक स्टुडिओ"चा प्रयत्न वरदानच ठरला आहे, यात शंका नाही.
 मोठ्या शहरातील आधुनिक स्टुडिओच्या धर्तीवर केवळ लहान बालकांच्या फोटोसाठीचा हा स्वतंत्र स्टुडिओ परळी सारख्या लहान गावात काढणे हे धाडसाचेच काम आहे. पण सौ संजीवनी भाले यांनी ते आपल्या कलेच्या आणि मेहनतीच्या जोरावर शक्य करून दाखवले आहे.
 यासोबतच  मॅटर्निटी फोटोशूट, ब्रायडल फोटोशूट, मॉडेलिंग फोटोज इत्यादी क्षेत्रात पण त्या सध्या आपले योगदान देण्याचा प्रयत्न करत आहेत.
 जागतिक छायाचित्र दिनाच्या निमित्ताने परळीतील या महिला छायाचित्रकारास फोटोग्राफीच्या पुढील प्रवासासाठी अनेक अनेक शुभेच्छा.
- शब्दांकन...
गोपाळ रावसाहेब आंधळे
माजी शिक्षण सभापती
परळी वैद्यनाथ
मो.9823335439





No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi