अंजनवेल पाणीपुरवठा योजना कार्यान्वित करणार
- मंत्री गुलाबराव पाटील
मुंबई, दि. ०४ : रत्नागिरी जिल्ह्यातील गुहागर तालुक्यातील मौजे अंजनवेल गावात जलजीवन योजनेचे ७० टक्के, तर पेठ अंजनवेल या गावात जलजीवन योजनेचे १० टक्के काम झाले आहे. या योजनेसाठी ग्रामपंचायतीसाठी ७६ लाख रुपये मंजूर झाले असून लवकरच काम पूर्ण करून ही पाणीपुरवठा योजना कार्यान्वित करण्यात येणार असल्याचे पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांनी आज प्रश्नोत्तराच्या तासात सांगितले.
सदस्य संजय केळकर यांनी याबाबत प्रश्न उपस्थित केला होता. यावेळी सदस्य राजेश टोपे, योगेश सागर, विजय वडेट्टीवार, नाना पटोले यांनीही उपप्रश्न उपस्थित केले.
मंत्री श्री. पाटील म्हणाले की, कुठल्याही योजनेच्या कामासाठी ग्रामसभेची संमती घेऊनच काम सुरू केले जाते. पाण्याच्या उद्भवासाठी भूजल सर्वेक्षण विभागाकडून पाणी उपलब्धता प्रमाणपत्र देण्यात येते. प्रमाणपत्र असल्याशिवाय पाणीपुरवठा योजनेतील पाण्याचा उद्भव करण्यात येत नाही.
पाणीपुरवठा योजनांची कामाची संख्या जास्त असल्यामुळे एका कंत्राटदाराकडे एकापेक्षा जास्त योजनांची कामे आहेत. तालुक्यातील एकत्रित कामांची एकच निविदा काढण्यात आली होती. मात्र, न्यायालयाच्या निकालामुळे एकत्र कंत्राट न देता सुशिक्षित बेरोजगारांना काम मिळावे, यासाठी त्यांच्या कामाच्या अनुभवानुसार कंत्राट देण्यात आले आहे. पाणीपुरवठा योजनांचे देयक त्रयस्थ संस्थेकडून कामाचे अंकेक्षण केल्याशिवाय काढण्यात येत नाही. तसेच या गावातील योजनेमधील तांत्रिकदृष्ट्या त्रुटींची मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली चौकशी करण्याचे आदेश देण्यात येतील, असेही मंत्री श्री. पाटील यांनी यावेळी सांगितले.
No comments:
Post a Comment