काही दैवतांची #संयुक्त_उपासना अत्यंत लाभदायक असते. काहीवेळा संयुक्त उपासनेशिवाय काही विशिष्ट देवता कार्यान्वित होतच नाहीत असा माझा अभ्यास आहे. म्हणजे जोपर्यंत एखाद्या विशिष्ट देवतेच्या उपासनेची जोड तुमच्या आराध्य दैवताला मिळत नाही तोपर्यंत ती देवता कार्यप्रवण होत नाही असा अनुभव आहे.
उदा - #श्रीलक्ष्मीनारायण या संयुक्त देवता आहेत. म्हणजे लक्ष्मीची नुसती उपासना कितीही केलीत तरी उपयोग शुन्य. जोपर्यंत तिच्या उपासनेआधी तुम्ही श्रीविष्णुदेवांची उपासना, स्मरण करत नाही तोपर्यंत लक्ष्मीउपासना निष्फळ ठरते. पण हाच नियम #शिवपार्वती साठी नाही. अर्थात त्यांची संयुक्त उपासना केली तरी चालेल पण लक्ष्मीनारायणाइतकं ते Mandatory नाही.
तद्वतच श्रीमारुती उपासनेआधी तुम्ही श्रीरामांची उपासना किंवा स्मरण चिंतन करायला हवंच. श्रीसाईबाबांची उपासना केली तर विष्णुसहस्त्रनामाची जोड हवीच. कालभैरव उपासनेआधी शिव उपासनेची किंचित बैठक हवी. तशीच लक्ष्मी+कुबेर संयुक्त उपासना आहे. म्हणजे कुबेराच्या उपासनेआधी लक्ष्मी उपासना केली पाहिजे. आणि कुबेर हा यक्ष असून तो #शिवसखा आहे त्यामुळे त्याच्या उपासनेपूर्वी शंकराची उपासना किंवा निदान ॐ नमः शिवाय थोडा जप हवाच. स्वामी समर्थ उपासनेतही थोडं शिवस्मरण करायला हवंच. राधेचं स्मरण केल्याशिवाय श्रीकृष्ण उपासना लाभदायक नाही. गोंदवलेकर महाराज किंवा श्रीरामा स्वामी जर तुमचे सद्गुरु असतील तर तुम्हाला श्रीराम उपासना केल्याशिवाय गत्यंतर नाही....
संयुक्त उपासना ही कधीही उत्तम. एकापेक्षा अधिक शुभतत्वे आकर्षित करण्याचे सामर्थ्य यात असते. गणपती, दूर्गा, कार्तिकेय, दत्तात्रेय या स्वतंत्र देवता आहेत.
-सचिन मधुकर परांजपे (पालघर)
No comments:
Post a Comment