नृसिंहवाडीला अनेकदा भाषाशैलीने आपण गोंधळात पडतो . भाषा मराठीच पण इथले शब्दप्रयोग हे फारच वेगळे वाटतात . एकदा नृसिंहवाडीला मुक्काम असताना सहज चौकशी केली अमुकतमुक पुजारी दिसत नाहीत ते ? . तात्काळ समोरून उत्तर आले कि आताच देवाकडे गेले आहेत . मला अत्यंत वाईट वाटले पण तितक्यात ते पुजारी समोर हजर . नंतर मला समजले कि हि मंडळी देवाकडे हा शब्दप्रयोग देवळात या अर्थी करतात . त्यांना सहज म्हटले आज खूपच उशीर झाला नाही ?? तर ते म्हणाले , होय कि !! उद्योग सोडून कसं चालेल ?? मला उद्योग या शब्दाचा अर्थ उमगला नाही पण अज्ञान लपवत म्हटलं ,अगदी खरं !! . नंतर कळले की उद्योग म्हणजेच पौरोहित्य .
एकदा मनात आलं कि आपण लघुरुद्र करावा आणि हा मानस मी आमच्या उपाध्येना सांगितला ,तेव्हा त्यांनी प्रतिप्रश्न केला ,कसा करूया ? ओला कि कोरडा ?? रुद्र या विषयी वाचन झाले होते ,थोडीफार माहिती देखील होती पण हा संदर्भ मात्र नवीन होता . ओला किंवा कोरडा म्हणजे नेमके काय असे विचारताच ते म्हणाले ,अहो आचार्य, ब्राह्मण भोजनासहित म्हणजे ओला आणि केवळ आपण दूध ,केळी आदी अल्पोपहार दिल्यास त्याला कोरडा म्हणतो .
दत्त महाराजांच्या उत्सव मूर्तीला इथे स्वारी असे म्हणतात .स्वारी हा पुजारी वर्गाचा जिव्हाळ्याचा आणि प्रेमाचा विषय .प्रत्यक्ष दत्त महाराजांचे सान्निध्य म्हणजे नेमके काय ते इथे अनुभवावे . स्वारीच्या चेहेऱ्यावरील भाव अर्थात दत्त महाराजांची नित्य बदलणारी मुद्रा हा एक अनुभव आहे , एक अनुभूती आहे .
नृसिंहवाडीला मूळपुरूषापासून पुजारीवर्गाच्या चार शाखा पुढे विस्तार पावत आहेत त्या शाखांना फाडे असे म्हटले जाते . दत्त महाराजांची पूजा या शाखा विभागून करीत असतात . प्रतिवर्षी एका शाखेची पाळी येते यांनाच हक्कदार पुजारी असे म्हटले जाते . या वर्षाच्या कालखंडाला वर्षेली असे संबोधले जाते . माघ प्रतिपदेला दत्त महाराजांच्या पूजनात शाखा बदल होतो . या पुजारी वर्गाचे गोत्र एकच असल्याने अशौच आल्यास ते सर्वाना एकदम लागू होते मग या वेळी येथे असलेल्या इतर गोत्रांच्या पुजारी वर्गाकडून पूजा होते . हे सर्व मूळ पुजारी वर्गापैकी नसले तरी दत्त महाराजांच्या पूजेचा मान त्यांना देखील अशा प्रसंगी मिळतो . या पुजारी वर्गात कोडणीकर ,जमदग्नी ,वाडीकर ,बोरगावकर आदी मंडळी येतात . यांना इथे परिष्ट असे म्हटले जाते .
शब्द प्रयोग कसेही असले तरी या नृसिंहवाडीतील सर्व पुजारीवर्ग हा अत्यंत कोमल अथवा मऊ हृदयाचा आहे . अल्पावधीत मिसळून जाणारा आणि अल्पसंतुष्ट अशा पुजारी वर्गाची निवड दत्त महाराजांनी का केली ? याचे उत्तर त्यांच्या सान्निध्यात राहिल्याशिवाय मिळणार नाही . आवर्जून नृसिंहवाडीला भेट द्या आणि या क्षेत्रस्थांचे आदरातिथ्य अनुभवा . श्री गुरुदेव दत्त !!! --- अभय आचार्य💫🙏🏻
🚩
No comments:
Post a Comment