राज्य उत्पादन शुल्क विभागाचे सातारा जिल्ह्यातील
वाटोळे येथे प्रशिक्षण केंद्र
सातारा जिल्ह्यातील तालुका पाटण येथील मौजे वाटोळे येथे राज्य उत्पादन शुल्क विभागाकरीता स्वतंत्र प्रशिक्षण केंद्र स्थापन करण्यास आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते.
या प्रशिक्षण केंद्राकरीता सर्व्हे नं. 67 मधील 14.30 हे.आर व सर्व्हे नं. 75 मधील 4.86 हे.आर अशी एकूण 19.16 हे.आर. मधील प्रस्तावित जमीन महसूल व वन विभागाच्या संमतीच्या अधीन राहून राज्य उत्पादन शुल्क विभागाकडे हस्तांतरित करण्यात येईल.
राज्य उत्पादन शुल्क विभाग हा शासनास महसूल देणाऱ्या प्रमुख विभागांपैकी एक आहे. या विभागाद्वारे शासनास 2022-23 या आर्थिक वर्षात सुमारे 21 हजार 550 कोटी इतका महसूल जमा करण्यात आलेला आहे. 2023-24 या आर्थिक वर्षाकरिता 25 हजार 200 कोटी इतके महसुली उद्दिष्ट आहे. तर पुढील आर्थिक वर्ष सन 2024-25 साठी 30 हजार 500 कोटी उद्दिष्ट देण्यात आले आहे. विभागाकडे आकृतीबंधानुसार अधिकारी, कर्मचारी यांची मंजूर संख्या 3842 इतकी आहे.
राज्य उत्पादन शुल्क विभागाला राज्यासाठी मोठा महसूल मिळवून देण्याचे उद्दिष्ट देण्यात येते. दरवर्षी या उद्दिष्टात वाढ करण्यात येत आहे. त्यानुषंगाने विभागातील अधिकारी/कर्मचारी त्यांना देण्यात आलेले उद्दिष्ट गाठण्यासाठी अवैध मद्यावर नियंत्रण मिळविण्याचे प्रयत्न करत असतात. त्याकरिता मोठ्या प्रमाणावर प्रतिबंधात्मक कारवाया व गुन्हे नोंद करण्यात येतात. हे गुन्हे नोंदविणे, त्याचा तपास करुन गुन्हे सिद्ध करण्यास्तव कायदेशीर तरतुदीचे तसेच तपासकामी अद्ययावत तंत्रज्ञानाचा वापर करणे इ. बाबींचे ज्ञान आवश्यक असते. यासाठी राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधिकारी व कर्मचारी यांची शारीरिक क्षमता वृध्दिंगत करण्याकरीता शारीरिक व कायदेविषयक प्रशिक्षण देण्याकरीता विभागाचे अद्ययावत प्रशिक्षण केंद्र उभारणी करणे गरजेचे होते.
No comments:
Post a Comment