पाणीपुरवठा योजनेतील खंडित विद्युत जोडण्या तातडीने सुरू कराव्या
- मंत्री राधाकृष्ण विखे पाटील
मुंबई, दि. 29 : अहमदनगर जिल्ह्यातील टंचाई काळात पाण्याची समस्या निर्माण होऊ नये यासाठी महसूलमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांनी अधिवेशन काळात विधान भवनात तातडीची टंचाई आढावा बैठक घेतली व जिल्ह्यातील पाणी पुरवठा योजनेतील खंडित विद्युत जोडण्या तातडीने सुरू करून पाणी पुरवठा पूर्ववत करण्याचे आदेश दिले.
यावेळी जिल्ह्यातील शहरी आणि ग्रामीण भागातील विद्युत पुरवठा खंडित झाल्यामुळे बाधित झालेल्या विविध पाणी पुरवठा योजनांचा आढावा घेण्यात आला. महावितरण विभागाने महापालिका क्षेत्रातील वीज देयक प्रलंबित असल्यामुळे काही जोडण्या खंडीत करण्यात आल्या असल्याची तर ग्रामीण भागात जिल्हापरिषदेच्या थकित देयकामुळे वीज जोडण्या खंडित करण्यात आल्याची माहिती दिली. यामुळे पाणी पुरवठ्याच्या योजना बाधित होत असल्याचे सांगितले.
पालकमंत्री श्री. विखे पाटील यांनी महानगरपालिका आणि जिल्हा परिषदेला तातडीने महावितरण विभागाचे थकित देयके देण्याचे आदेश दिले. यासंदर्भात तातडीने शासनाकडे अहवाल सादर करण्याचे जिल्हाधिकारी यांना सांगितले. शासनाकडून आवश्यक ती मदत करण्याचे आश्वासन यावेळी पालकमंत्र्यांनी दिले. त्याच बरोबर विद्युत पुरवठा खंडित झाल्यामुळे बंद झालेल्या पाणी पुरवठा योजनांची पाहणी करून बाधित झालेला पुरवठा तात्काळ पूर्ववत करून नागरिकांना दिलासा देण्यास सांगितले. टंचाई काळात जिल्ह्यात पाण्याची समस्या निर्माण होणार नाही असेही पालकमंत्री म्हणाले.
या बैठकीला सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम) मंत्री दादाजी भुसे, महावितरणचे मुख्य अभियंता संजय पाटील तर दूरदृश्य संवाद प्रणालीच्या माध्यमातून अहमदनगरचे जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ, महानगरपालिका आयुक्त पंकज जावळे, महावितरण नाशिकचे मुख्य अभियंता दीपक कुमटेकर उपस्थित होते.
No comments:
Post a Comment