Monday, 18 December 2023

कीटकनाशके आणि अन्य साठ्यांच्या अपहारांवर आळा घालण्यासाठी अधिकाऱ्यांना विशेष प्रशिक्षण

 कीटकनाशके आणि अन्य साठ्यांच्या अपहारांवर

आळा घालण्यासाठी अधिकाऱ्यांना विशेष प्रशिक्षण

-         मंत्री धनंजय मुंडे

 

नागपूर दि. 18 : महाराष्ट्र कृषी उद्योग विकास महामंडळाच्या माध्यमातून कीटकनाशकांसह उपलब्ध करण्यात आलेल्या अन्य साहित्याच्या साठ्याच्या बाबतीत घडणाऱ्या अपहाराच्या घटनांवर कायमस्वरूपी आळा घालण्यासाठी अधिकाऱ्यांना विशेष प्रशिक्षण देण्याचे नियोजन करण्यात येत असल्याचे कृषीमंत्री धनंजय मुंडे यांनी आज विधान परिषदेत प्रश्नोत्तराच्या तासात सांगितले .

अकोला जिल्ह्यातील महामंडळाच्या विभागीय कार्यालयातील भांडारपालाने कीटकनाशकांच्या केलेल्या गैरव्यवहारासंदर्भात सदस्य अमोल मिटकरी यांनी विधान परिषदेत प्रश्न उपस्थित केला होता. त्यावेळी मंत्री श्री. मुंडे बोलत होते. या चर्चेत सदस्य सर्वश्री प्रवीण दरेकर, भाई जगताप यांनी सहभाग घेतला.

यावेळी कृषीमंत्री श्री. मुंडे म्हणाले कीसंबंधित भांडारपालास निलंबित करण्यात आले असून त्याच्यावर विभागीय चौकशी सुरू आहेतसेच या अपहाराच्या संदर्भात नेमण्यात आलेल्या सत्यशोधक समितीच्या अहवालानुसार संबंधित भांडारपालावर अकोला एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा देखील दाखल करण्यात आला आहे .

महामंडळाच्या माध्यमातून शेतकऱ्यांना लाभ मिळावा हा अंतिम उद्देश शासनाचा आहे. मात्र कोणत्याही कर्मचारी किंवा अधिकारी शासनाची फसवणूक करून शेतकऱ्यांसाठी उपलब्ध करण्यात आलेल्या सामग्रीचा अपहार करत असेल, तर अशा अधिकारी किंवा कर्मचाऱ्यांची सरकार गय करणार नाही. त्यांच्यावर कठोर कारवाई केली जाईलअसेही श्री. मुंडे यांनी यावेळी स्पष्ट केले.

यासंदर्भातील कारवाई गतीने पूर्ण केली जावी. याबाबत सत्यशोधक समितीच्या अंतिम अहवालात सर्वकाही स्पष्ट होईल व दोषीवर कायदेशीररित्या कठोर कारवाई केली जाईलअसे मंत्री श्री. मुंडे यांनी स्पष्ट केले.

000

दत्तात्रय कोकरे/विसंअ/

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi