क्रूर, जुलमी, परकीय राज्यकर्त्यांच्या वंशावळी आम्हाला शिकवल्या गेल्या, पण पूज्य हाडा चौहान राणीसाहेब; तुमचं नावही आम्हाला ठाऊक नाही हे आमचंच दुर्दैव आहे...
..
मेवाडचे महाराणा राजसिंहांच्या (पहिले...१६५३-१६८०) राजसभेत रुपनगरचा राजपुरोहीत एक पत्र वाचत होता आणि महाराणा एकाग्रतेनं ते ऐकत होते... ..."शिसोदिया कुलभूषण, क्षत्रिय शिरोमणि महाराणा राजसिंह यांनी रूपनगर राजकन्येचा प्रणाम स्विकार करावा! महाराज; मुगल औरंगजेबानं माझ्याकडे विवाहाचा आदेश पाठवलेला आहे. पण तुम्हीच सांगा की पवित्र कुळातील माझ्यासारखी राजकन्या त्या क्रूर, पापी आणि कपटी म्लेंच्छाशी स्वप्नातदेखील विवाह करेल का? एक राजहंसिनी गिधाडासोबत कशी शोभेल? महाराज! आपणच माझ्याशी विवाह करुन औरंगजेबापासून माझं संरक्षण करावं असं निवेदन मी आपल्याला करते आहे. माझा स्विकार करायचा किंवा नाही हे आपल्यावरच अवलंबून आहे. माझ्या रक्षणाची जबाबदारी मात्र आता आपलीच आहे आणि जर आपण माझ्या रक्षणासाठी आला नाहीत तर आत्महत्या करण्याखेरीज माझ्याकडे कोणताच पर्याय नसेल..."
पत्रवाचन पूर्ण होताच राजसभेत उपस्थित सर्वच राजपूत सरदारांच्या तलवारी खणखणत म्यानातून बाहेर पडल्या...
महाराज राजसिंहांचं आता वय झालेलं असल्यानं राजकुमारीचं निवेदन स्विकारणं त्यांना अशक्य होतं. पण प्रत्येक दुबळ्याची पीडा म्हणजे स्वतःची पीडा समजत असलेल्या राजपूत वीरांची ती सभा होती...प्रतिष्ठेसाठी जौहर करणार्या मायबहिणींच्या पोटी जन्म घेतलेल्या आणि स्वतःचं मस्तकही चढवण्यास मागेपुढे न पाहणाऱ्या क्षत्रियांची ती सभा होती. असं असताना एका क्षत्रिय बालिकेचं ते समर्पणपूर्ण रक्षणार्थ निवेदन अस्विकार करणंही अशक्यच होतं.
राजसभेत उपस्थित सर्वच वीरांनी एकत्र स्वरात म्हटलं, "महाराज, राजकुमारीच्या प्रतिष्ठेचं रक्षण करावंच लगेल, अन्यथा ही राजसभा अपराधीपणानं एका भित्र्यासारखी मान खाली घालून बसेल. आपण सर्वजण लगेचच रूपनगरच्या दिशेनं कूच करुयात!" आणि अश्याप्रकारे महाराणा राजसिंह आपल्या सैन्यासह रूपनगरच्या राजकन्येच्या रक्षणासाठी निघाले.
या युद्धात आपल्या सहाय्यासाठी येण्याचा संदेश महाराणा राजसिंहांनी सलूंबरचे सरदार रतनसिंह चुंडावत यांनाही पाठवला. त्यावेळी रतनसिंह आपल्या घरात आपले कुटूंबिय आणि नवविवाहित पत्नीसोबत विवाहानंतर हिंदू प्रथेनुसार पार पाडल्या जात असलेल्या काही धार्मिक विधींमधे व्यस्त होते. त्यांचा विवाह नुकताच झालेला होता. रतनसिंहांनी जेंव्हा महाराणा राजसिंहांचा संदेश वाचला तेंव्हा ते गप्प गप्प झाले, कारण औरंगजेबाशी युद्ध याचाच अर्थ स्वतःची आहुती देणं आहे याची त्यांना जाणीव होती. सरदार रतनसिंहांना दृष्टीसमोर आपल्या नवविवाहित पत्नीचा सुंदर चेहरा दिसू लागला. त्यांची ही नवविवाहित पत्नी बूंदीच्या हाडा चौहान सरदाराची कन्या होती आणि तिच्यावर परमेश्वरानं स्वर्गीय सौंदर्य अक्षरशः उधळलेलं होतं.
रतनसिंहांनी धार्मिक विधी काही काळ थांबवण्याची विनंती केली आणि एकांकात जाऊन आपल्या नवपरिणित पत्नीला महाराणा राजसिंहांचा संदेश सांगितला. तो संदेश ऐकून दैवी सौंदर्यवती असलेल्या त्या सोळा वर्षाच्या राणीच्या चेहर्यावर अपार तेज झळकू लागलं आणि ती अभिमानानं रतनसिंहांना म्हणाली, "एक क्षत्राणी जेंव्हा आपल्या पतीच्या माथ्यावर तिलक लाऊन त्याला युद्धभूमीवर जाण्यासाठी हसत हसत निरोप देते; त्याहून सौभाग्याचा दिवस तिच्या आयुष्यात इतर कोणताही नसतो. मी एवढी भाग्यवान आहे की आपल्या विवाहाच्या एकाच आठवड्यानंतर मला ही महान संधी लाभते आहे. आपण लगेचच निघण्याची तयारी करावी. मी तुमच्या विजयासाठी आणि तुम्ही सुखरुप परत यावे यासाठी प्रार्थना करत तुमची वाट पाहेन."
त्या सोळा वर्षाच्या वीरांगनेने पती रतनसिंहांना भावनेपेक्षा कर्तव्य अधिक श्रेष्ठ असल्याची जाणीव करून दिल्यावर दुसर्या दिवशी सकाळी राणीनं रतनसिंहांच्या माथ्यावर तिलक लावला. पत्नीला आलिंगन देऊन ते आपल्या सैन्यतुकडीसह महाराणा राजसिंहांना युद्धभूमीवर मदत करण्यासाठी निघून गेले.
तिसर्या दिवशी रतनसिंहांनी एका विश्वासू दूताद्वारे आपल्या नवपरिणित राणीला पत्र पाठवलं, "युद्धाची पूर्ण तयारी झालेली आहे. आमच्या तलवारी मुघलांच्या सैनिकांचं रक्त पिण्यास आतूर आहेत. हे युद्ध भयंकरच होईल. मी परत येईन किंवा नाही हे नियतीलाच ठाऊक आहे. पण तुझा सुंदर चेहरा माझ्या दृष्टीपुढून हटण्यासच तयार नाहीये. एक मनातलं सांगतो...मी तुझ्याएवढं प्रेम कधीही कोणावर केलं नाही आणि यापुढेही करु शकणार नाही. तुझं स्मरण मला सदैव रहावं यासाठी तुझी एखादी निशाणी या पत्रदूतासोबत पाठव!"
पत्र वाचून ती कोवळ्या वयाची हाडा राणी गंभीर झाली. तिने सरदार रतनसिंहांना एक पत्र लिहीलं आणि पत्रवाहकाला बोलावून घेतलं. पत्रवाहकाने जेंव्हा राणीच्या चेहऱ्याकडे पाहीलं तेंव्हा तो भयानं थरथर कापू लागला. जणूकाही शरीरातील सगळं रक्त राणीच्या मुखावर जमा झालं होतं, तिचे मोकळे केस हवेमधे असे उडत होते की जणू काही एखादं तुफान वादळ चालू आहे. केवळ सोळा वर्षांच्या त्या कोवळ्या राणीच्या ऐवजी साक्षात् दुर्गा प्रकटल्याचा भास होत होता.
राणीनं गंभीर स्वरात पत्रवाहकाला विचारलं, "भैया, माझं एक महत्वाचं काम करशील का? माझं हे पत्र आणि एक वस्तू माझे पती सरदार रतनसिंहांपर्यंत घेऊन जा!"
आपोआप हात जोडले जाऊन पत्रवाहक म्हणाला, "ताई, आदेश दे!"
तेवढ्यात राणी एका झटक्यात पुढे सरसावली आणि पत्रवाहकाच्या कंबरेची तलवार तिने खेचून घेतली. काय होतंय हे कळण्याच्या आतच तिने ती तलवार सर्रकन् स्वतःच्या मानेवरुन सफाईने चालवली आणि एका क्षणातच हाडा राणीचं मस्तक धडावेगळं झालं. पत्रवाहक भयानं ओरडला.
दुसर्या दिवशी पत्रवाहक युद्धभूमीवर रतनसिंहांकडे आला आणि त्याने रतनसिंहांना हाडा राणीची पेटी दिली. आत काय आहे, हे ठाऊक नसल्यानं रतनसिंहांनी मोठ्या आनंदानं ती लाकडी पेटी उघडली. पण पेटी उघडताच आत आपल्या प्राणप्रिय पत्नीचं मस्तक पाहून ते दुःखातिशयानं ओरडले. रतनसिंहांनी राणीनं दिलेलं पत्र उघडलं...त्यात लिहिलेलं होतं...
"सरदार रतनसिंहांच्या चरणी त्यांच्या राणीचा प्रणाम! मी तुमची प्रेयसी नाही तर पत्नी आहे. पवित्र अग्नीला साक्षी ठेऊन आपण सात प्रदक्षिणा घेतल्यामुळे तुमचं-माझं नातं केवळ याच जन्मासाठी नाही तर पुढच्या सात जन्मांसाठी आहे. माझ्याविषयी असलेल्या चिंतेमुळे तुमच्या कर्तव्यात कोणतीही त्रूट राहू नये यासाठी मी स्वतःच तुमच्यापासून दूर जात आहे. स्वर्गामधे मी तुमची वाट पाहेन! रूपनगरच्या राजकुमारीच्या प्रतिष्ठेचं रक्षण करणं हे तुमचं प्रथम कर्तव्य आहे आणि ते पार पाडूनच आपण स्वर्गामधे पुन्हा भेटू! सरदार, एक सांगते...मीही तुमच्यावर अलोट प्रेम केलंय...कदाचित् स्वतःहूनही अधिक...!"
पत्र वाचत असताना रतनसिंहांच्या डोळ्यातून अखंडपणे अश्रू वहात होते...पाण्याबाहेर काढलेल्या एखाद्या मास्याप्रमाणे ते तडफडले. पण त्यांना अचानक काय झालं कोणास ठाऊक...! ते हसू लागले...दुःखानं खाली झुकलेलं त्यांचं मस्तक गर्वानं ताठ झालं, छाती फुलून आली.
त्यानंतर औरंगजेबासोबत जे युद्ध झालं त्यात रतनसिंहांच्या तळपत्या तलवारीचा भीमपराक्रम पहाण्यास जणू काही काळही येऊन उपस्थित होता. तीन दिवस चाललेल्या त्या युद्धात राजपूतांनी औरंगजेबाच्या सैन्याला हरवलं. आपल्या प्राणप्रिय राणीचं गतप्राण मस्तक एखाद्या अमुल्य रत्नाप्रमाणे गळ्यात बांधून नरवीर रतनसिंह अखेरच्या श्वासापर्यंत लढले आणि त्यांच्या तलवारीनं शत्रू सैन्याचं सर्वाधिक रक्त प्राशन केलेलं होतं. जेंव्हा जेंव्हा शत्रूचं शस्त्र सरदार रतनसिंहांच्या शरीराला स्पर्श करत असे, तेंव्हा तेंव्हा ते हसू लागत. एखाद्या सिंहासारखा अतुलनीय पराक्रम गाजवत असताना त्यांच्या शरीराचा एक एक अवयव कापला जात होता. अखेरीस सरदार रतनसिंह युद्धभूमीवरच अमर झाले...कर्तव्यपूर्ती करतच आपल्या प्राणप्रिय पत्नीच्या भेटीसाठी त्यांनी स्वर्गारोहण केलं. इकडे रूपनगरच्या राजकुमारीनं अखंड प्रतिष्ठेसह मेवाडच्या महाराणा राजसिंहांची धाकटी राणी होऊन उदयपुरमधे प्रवेश केला.
आपला देश एवढा सौभाग्यशाली आहे की या मातीमधे हाडा राणीसारख्या वीरांगना जन्मास आल्या...परंतु एका अर्थानं आपला देश असा अभागीही आहे की असीम त्याग केलेल्या त्या सोळा वर्षाच्या राणीचं मूळ नावही आपल्याला ठाऊक नाही...
पण मला एक गोष्ट निश्चितच ठाऊक आहे...आपला देश हाडा चौहान सरदाराच्या त्या सोळा वर्षांच्या कन्येचा अर्थात् सरदार रतनसिंहांच्या पत्नीच्या 'न भूतो न भविष्यती' त्यागाबद्दल सदैव ऋणी आहे...
(समीर अनिल थिटे)
No comments:
Post a Comment