भवताल इकोटूर्स... पर्यटनाचा वेगळा अंदाज !
(आजच्या जागतिक पर्यटन दिनानिमित्त)
नागरिकांना असं काहीतरी वेगळं देता आलं पाहिजे, जे इतर कोणी दिलं नसेल... शिवाय त्यातून काहीतरी शिकायला अनुभवायला सुद्धा मिळायला हवं...
मग असं काय असू शकेल?
लोकांना खडक उलगडून दाखवले तर.. दोन हजार वर्षांपूर्वीच्या प्राचीन व्यापारी मार्गावर फिरवले तर.. आपल्या पूर्वजांनी निर्माण केलेल्या पाण्याच्या अफलातून व्यवस्थांची सफर घडवली तर.. मान्सूनसोबत फिरून वेगळा अनुभव देता आला तर..
‘भवताल इकोटूर्स’ या उपक्रमाचे मूळ आहे ते, असं वेगळं काहीतरी देण्याची पॅशन / प्रेरणा आणि लोकांना आपला निसर्ग-पर्यावरण-वारसा या व्यापक भवतालाशी जोडून घेण्याच्या धडपड, यामध्ये. त्यातूनच नवनव्या कल्पना निर्माण होत गेल्या, त्याला लोकांचा प्रतिसाद मिळत गेला आणि त्या कल्पना प्रत्यक्षात उतरल्यासुद्धा! दोन वर्षापूर्वी ज्या गोष्टी केवळ मनातील कल्पना होत्या - फॅन्टसी होत्या, त्या आज प्रत्यक्ष घडताना पाहताना कमालीचा आनंद होतो, उत्साहही वाढतो.
या उपक्रमातून नेमकं काय मिळतंय?.. कल्पना करा की, एखाद्या मुलाला / व्यक्तीला जीवाश्म (फॉसिल्स) पाहायचेत, चांगल्या प्रकारे समजून घ्यायचेत. त्याला भूविज्ञानाची पार्श्वभूमी नाही आणि निसर्गाचा अभ्यासही नाही. अशा व्यक्तीला जीवाश्म पाहता येतील का - समजून घेता येतील का? त्याची ही इच्छा कशी पूर्ण होईल?
हे एक छोटंसं उदाहरण. निसर्गातील अशा कितीतरी गोष्टी मुलांना / लोकांना पाहायच्या आहेत, अनुभवायच्या आहेत, समजूनही घ्यायच्या आहेत. त्यासाठी मार्ग कोणता? ते घडवून आणणारा मंच कोणता? आता माहिती-तंत्रज्ञानाच्या क्रांतीमुळे आणि जग जवळ आल्यामुळे जगाच्या कानाकोपऱ्यातील गोष्टी आपल्यापर्यंत पोहोचत आहेत. निसर्गातील विलक्षण गोष्टी, प्राचीन वारसा-संस्कृती, पुरातत्त्वीय गोष्टी, पाण्याच्या व्यवस्था, प्राचीन हवामान, त्या काळातील जीव-त्यांचे अवशेष... असं कितीतरी मोठं जग खुलं झालं आहे. त्यातूनच आपल्या अवतीभवतीच्या सुद्धा अशाच अद्भुत गोष्टींचा शोध घेण्याची, त्या पाहण्याची प्रेरणा निर्माण झाली आहे. ही प्रेरणा, कुतूहल यांना योग्य दिशा देण्याची आणि वाट उपलब्ध करून देण्याची महत्त्वाची भूमिका ‘भवताल इकोटूर्स’ हा उपक्रम बजावत आहे.
नागरिकांना अशा प्रकारे आगळावेगळा अनुभव देणे आणि तज्ज्ञांसोबत या गोष्टी एक्सप्लोर करण्याची संधी उपलब्ध करून देण्यासाठी हे सारं. त्यातून मिळणारा आनंद, शमणारं कुतूहल, पुन्हा नव्या गोष्टींबद्दल निर्माण होणारी उत्सुकता... हे शब्दांत मांडता येणार नाही. या सर्वांच्या मुळाशी असलेला प्रमुख उद्देश म्हणजे- लोकांना व्यापक भवतालाशी जोडून घेणे. त्यातूनच त्याबद्दलची खरीखुरी जागरुकता निर्माण होईल आणि ‘भवताल’ या मंचाला अभिप्रेत असलेला पर्यावरणसजग समाजाच्या निर्मितीचा उद्देश काही प्रमाणात तरी साध्य होईल. त्यासाठीच हे प्रयत्न!
आताशी कुठं सुरूवात आहे, पुढे अख्खा महाराष्ट्र वेगवेगळ्या थीम्सद्वारे पालथा घालायचा आहे. त्यातील धमाल गोष्टी जगापुढं आणायच्या आहेत, त्यांचा अद्भुत अनुभव लोकांना द्यायचा आहे. महाराष्ट्रापाठोपाठ इतरही राज्ये आणि देश असं भलं मोठं दालन समोर आहे. त्यातलं जे आपल्यापर्यंत पोहोचलं नाही, व्यापक पद्धतीने पोहोचलं नाही, ते पोहोचवायचं आहे... अर्थातच, तुमच्या सर्वांच्या साथीने!
‘भवताल इकोटूर्स’ तर्फे आतापर्यंत प्रत्यक्षात आलेल्या काही थीम्स:
• कलर्स ऑफ मान्सून
• लाईफ ऑन प्लॅटूज
• फ्लर्टिंग वुईथ द रॉक्स
• दोन हजार वर्षांच्या प्राचीन व्यापारी मार्गावर
• एक तरी वाडी अनुभवावी...
• अजिंठ्यातील रहस्यांचा शोध
• वंडर्स ऑफ जिऑलॉजी
• वसंतोत्सव
• भंडारदरा, सांधन आणि कळसुबाई (मुलांसाठी नेचर-कॅम्प)
• एक्सप्लोरिंग मान्सून @केरळ
• वर्ल्ड्स् हेविएस्ट रेन @चेरापुंजी
• ऐतिहासिक जलव्यवस्थांची सफर
• कातळशिल्पांच्या गूढ विश्वात (आगामी)
• जीवाश्मांसोबत पृथ्वीचा इतिहास @कच्छ (आगामी)
- अभिजित घोरपडे
संस्थापक, भवताल मंच
bhavatal@gmail.com
--
भवताल
(हवा, पाणी, पर्यावरणाचा आरसा)
९५४५३५०८६२ / bhavatal@gmail.com
Bhavatal
(A platform dedicated to issues in water, environment and s
ustainability)
9545350862 / bhavatal@gmail.com

No comments:
Post a Comment