मुंबईला आंतरराष्ट्रीय शाश्वत शहर बनविण्याचा प्रयत्न करुया
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
मुंबई, दि.२७ : राज्यशासन, मुंबई महानगर पालिका, नरिमन पॉइंट चर्चगेट रहिवाशी संघ आणि नागरिक या सर्वांच्या एकत्रित प्रयत्नाने मुंबईला आंतरराष्ट्रीय शाश्वत शहर बनविण्याचा प्रयत्न करण्याचे, आवाहन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.
मुंबईतील मादाम कामा रोड येथे पंडित जवाहरलाल नेहरू उद्यानाच्या सुशोभिकरण केलेल्या कामांचे आणि मनोरंजन उद्यानाचे लोकार्पण उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आज करण्यात आले. त्यावेळी उपमुख्यमंत्री बोलत होते.
उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणाले की, मुंबई महानगरपालिकेच्यावतीने सुशोभीकरणाचा प्रकल्प राबविला जात आहे. या अंतर्गत 20 हजार चौरस फूट विविध उद्याने तसेच मियावाकी जंगल विकसित करण्याचे काम सुरू आहे. राज्यात जास्तीत जास्त हरित क्षेत्र निर्मितीसाठी प्रयत्न सुरू आहेत. हे केवळ नागरिकांच्या सहाय्याने शक्य आहे.
नरिमन पॉइंट चर्चगेट रहिवाशी संघ यांनी या उद्यानसाठी केलेल्या प्रयत्नांना आज यश आले असून, संघाचे सदस्य, नागरिक, मनपा आणि लोकप्रतिनिधींना उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी यावेळी शुभेच्छा दिल्या.
यावेळी विधानसभा अध्यक्ष ॲड. राहूल नार्वेकर, मुंबई उपनगर जिल्ह्याचे पालकमंत्री मंगलप्रभात लोढा, अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (पुर्व उपनगरे) आश्विनी भिडे, अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (प्रकल्प) पी. वेलारासू , अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त ( पश्चिम उपनगरे) सुधाकर शिंदे, नगरसेवक हर्शिता नार्वेकर, मकरंद नार्वेकर , रहिवाशी संघाचे प्रतिनिधी आणि नागरिक उपस्थित होते.
*****
No comments:
Post a Comment