महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सच्या अध्यक्षपदी ललित गांधी यांची फेरनिवड
वरिष्ठ उपाध्यक्षपदी अनिलकुमार लोढा
मुंबई : ''महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स, इंडस्ट्री ॲण्ड ॲग्रीकल्चर'' संस्थेच्या अध्यक्षपदी ललित गांधी यांची तर वरिष्ठ उपाध्यक्षपदी अनिलकुमार लोढा यांची बिनविरोध निवड झाली आहे.
चेंबरच्या अध्यक्षपदासाठी ललित गांधी यांचा एकमेव अर्ज आल्याने त्यांची बिनविरोध निवड करण्यात आली. वरिष्ठ उपाध्यक्ष पदासाठी अनिलकुमार लोढा, करुणाकर शेट्टी आणि उमेश दाशरथी असे तिघांचे अर्ज दाखल झाले होते. पैकी करुणाकर शेट्टी आणि उमेश दाशरथी यांनी आपले उमेदवारी अर्ज मागे घेतल्याने वरिष्ठ उपाध्यक्षपदी अनिलकुमार लोढा यांची बिनविरोध निवड झाली. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून चेंबरचे सरकार्यवाह सागर नागरे यांनी काम पाहिले.
या निवडीनंतर प्रतिक्रिया व्यक्त करताना ललित गांधी म्हणाले की, ललित गांधी गेल्या 21 वर्षापासुन महाराष्ट्र चेंबरमध्ये कार्यरत असून गव्हर्निंग काऊन्सील सदस्य, उपाध्यक्ष, वरिष्ठ उपाध्यक्ष अशा विविध पदांवर त्यांनी कार्य केले आहे. विविध राज्य व राष्ट्रीय स्तरावरील शिखर संस्थांवर महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करीत आहेत.
शतकमहोत्सवाकडे वाटचाल करणाऱ्या राज्याच्या शिखर संस्थेचे नेतृत्व करण्याची संधी पुन्हा मिळणे ही दुर्मिळ व महत्वपूर्ण घटना आहे. महाराष्ट्र चेंबरच्या माध्यमातून संपूर्ण महाराष्ट्रासह चेंबरच्या कार्यक्षेत्रातील सर्व भागांतील व्यापार-उद्योग-कृषी व कृषीपूरक उद्योग व पायाभूत सुविधांच्या विकासासाठी आपण कार्यरत राहणार आहे. छोट्यात छोट्या व्यापारी - उद्योजकांचे प्रश्नंही प्राधान्याने हाती घेतले जातील. तसेच महाराष्ट्राला संपूर्ण देशात पुन्हा एक नंबरवर आणण्यासाठी केंद्र व राज्य सरकारच्या बरोबर कार्य करून यश मिळवु, असेही त्यांनी सांगितले.
नूतन वरिष्ठ उपाध्यक्ष अनिलकुमार लोढा यांनी महाराष्ट्र चेंबरच्या उत्तर महाराष्ट्र विभागाचे दोनदा उपाध्यक्षपद भूषविले आहे. ते गेल्या २० वर्षापासून चेंबरशी संलग्न आहेत. गेले ४ टर्म त्यांनी कार्यकारिणी मंडळात प्रतिनिधित्व केले हाते. सन २०१६ ते २०२१ साली मध्ये उपाध्यक्ष म्हणूनही कार्यरत राहिले आहेत. जगभरात प्रसिद्ध असलेल्या मे. भागचंद लोढा उद्योग समूहातील एम. बी. शुगर अण्ड फर्मस्युटिकल्स लि. कंपनीचे संचालक आहेत. बॉम्बे शुगर मर्चंन्ट असोसिएशनचे कार्यकारिणी सदस्य आहेत.
चौकट : १६ जूनला राजभवनात दिमाखदार सोहळा
दरम्यान महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सचे संस्थापक शेठ वालचंद हिराचंद यांच्या स्मृती व्याख्यानाचे ५० वे सत्र राज्यपाल रमेश बैस यांच्या अध्यक्षतेखाली होत आहे. येत्या १६ जून, २०२३ रोजी सायंकाळी ४ वाजता राजभवनातील दरबार हॉल मध्ये दिमाखदार सोहळ्याचे नियोजन केले असून निर्वाचित अध्यक्ष आणि वरिष्ठ उपाध्यक्षांचा पदग्रहण समारंभ या वेळी संपन्न होणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
विविध प्रश्न मार्गी
महाराष्ट्र चेंबरच्या ९६ वर्षाच्या इतिहासात पहिल्यांदाच १ कोटी, ३२ लाख रुपये गेल्या वर्षभरात उत्पन्न मिळविले. केंद्र सरकार आणि राज्य सरकारकडे व्यापारी आणि उद्योजकांच्या विविध मागण्या मांडून त्या मार्गी लावल्या. प्लास्टिकच्या वस्तूंच्या वापरावरील निर्बंध, कोरोना काळात उद्योजकांचे सरकारकडे प्रलंबित असलेले अनुदान थेट खात्यात जमा, विदर्भ विकास परिषद, उत्तर महाराष्ट्र विकास परिषद, राज्यस्तरीय कौशल्य विकास परिषद, महाराष्ट्र ट्रेड इंटरनॅशनल एक्स्पो (मायटेक्स) मुंबईत भरविले. महाराष्ट्र चेंबरच्या नाशिक कार्यालयासाठी सातपूर औद्योगिक वसाहतीत एमआयडीसीकडून १० हजार चौरस फुटाचा भूखंडाची मंजूरी मिळविली

No comments:
Post a Comment